कविता - 🌷" लहानपण देगा देवा "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ४ सप्टेंबर २०१६
निरागस चेहरा आणि मोहकसे हावभाव...
लडिवाळ हास्य अन् तो मधुर आविर्भाव...
लक्ष वेधून घेणारी, लाडिकशी चिव-चिव...
हवीहवीशी वाटे, मधाळ-भाबडी टिव-टिव...
कळत-नकळतच आईची नक्कल करतात...
तिची प्रत्येक हालचाल, डोळ्यांनी टिपतात...
नेहमीच बारीक निरीक्षण ते करीत असतात...
अन् मोठे होऊन मात्र लहानच बनून राहतात...!
आईसारखी पर्स लटकते छोट्याशा खांद्यावर...
फॅशनेबल गॉगल घसरतोय नकट्या नाकावर...
उंच टाचेच्या सँडल्स इवल्या-इवल्या पायाला...
नवनवी ओढणी सावरित-सावरीत मिरवायला...
घड्याळ बघत-बघत स्वारी 'ऑफीस'ला निघते...
जाताना सर्वाना, सूचनांची यादीच देऊन जाते...
खाऊचा खोटा-खोटा डब्बा सुध्दा तयार करते...
बाहुलीला शाळेसाठी मस्त तयार करून टाकते...
करुन सगळा जामानिमा, बाईसाहेब निघतात...
खोट्या चावीने खेळण्याची गाडी सुरु करतात...
नक्कल करीतच, कारचे आरसे ठीक करतात...
दोनतीन चकरा मारुन"दमले ग बाई"म्हणतात...
कुणी उगाच नाही म्हटलंय,"लहानपण देगा देवा"...
निसटलेला तो सोनेरी काळ, वाटे सदा हवा हवा ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले🙏🕉️🔆
Leave a Reply