कविता – 🌷 ” रसिक-अहो-आई “


कविता - 🌷 " रसिक-अहो-आई "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

पूर्वी, सांगितल्याप्रमाणे माझ्या सासूबाई म्हणजे "अहो-आई "
प्रेमळ-सात्विक-आपलेपणानं-वागणं-बोलणं जणू "प्रति-आई "

वागायला बोलायला मस्त मनमोकळ्या पण थोड्याशा लहरी
सगळ्या आनंददायक-छान-गोष्टींची त्यांना आवड होती भारी

नाव सासरचं सुशीला, माहेरचं वेणू, गोड गळा-स्वभाव भोळा
सतेज-गौरवर्ण-सुंदर-गोल चेहरा कानी कुड्या-मंगळसूत्र गळा

सुगरण इतक्या होत्या की हाताला चव उत्कृष्ट
काहीही त्यांनी बनवलं तर उत्तम अन् स्वादिष्ट

संगीत-विशारद होत्या सुरेख गाणी म्हणायच्या
राम-नवमी, हनुमान-जयंतीस कीर्तन करायच्या

थंड हवेच्या विविध ठिकाणी, फिरावयास जाणं
आवडीनं नवेजुने नाटक-चित्रपट बघायला जाणं

अक्साला, जुहू-चौपाटीला, पवई-विहारला जाणं
बटाटावडा, पाणीपुरी, भेळपुरी,आईस्क्रीम खाणं

भावगीत, नाट्यसंगीत, भक्तीसंगीत ऐकणं, गाणं
आनंद देणं, आनंद घेणं, एकूण रसिकतेनं जगणं

त्यांच्याबरोबर बद्रीनाथ-केदारनाथ-यात्रा झाली
रामेश्वर-मदुराई-कन्याकुमारी-त्यांच्यासह सहली

त्यांनी स्वत:च खूप जास्त सासुरवास भोगलेला
त्यामुळेच त्यांना वाटे कुठं ठेवू-कुठं नको-सुनेला

आवडीनं लाड करायच्या -नातवांना फिरवायच्या
सण-वार, हौस-मौज सगळं मनापासून करायच्या

नेसायच्या त्या जुन्या पठडीतील नऊ-वारी साडीच
पण त्यांचा जीवन-दृष्टिकोण मात्र अत्यंत आधुनिक

आज, गौपूजा-वसुवारस, तिथीने, त्यांचा जन्म-दिवस
म्हणून आजचं कवन,"रसिक अहो-आईना"प्रेमे अर्पण

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!