कविता : 🌷 " रथाची दोन चाके "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
असं म्हणतात लग्नाच्या गाठी या पूर्व-नियोजित असतात
संसार सुखाचा होण्यास पति-पत्नी पूरक असावे लागतात
पूर्वीच्या काळी लग्नात वडील मंडळींच पुढाकार घ्यायची
घराणे, गोत्र, सुसंस्कार यावरुनच लग्न, विवाह ठरवायची
सामान्यतः लग्नाळू वर-वधू किशोर-वयातीलच असायची
त्यामुळे त्यांची पसंती-नापसंती गृहीत धरलेली असायची
लग्नाक्षता डोक्यावर पडता, संसार निभावणं होतं अध्याहृत
दोघे खूप भिन्न स्वभावाचे असूनही संसार होत असे सुखरुप
शांत स्वभाव म्हणून आईचं पाळण्यातलं नाव शांता ठेवलेलं
लग्नात "केशव"रावांनी शांतेचं नाव बदलून"राधा" ठेवलं होतं
काका लख्ख गोरेपान, मध्यम-बांधा-उंची, गर्भश्रीमंतीचं तेज
राधा होती नाके-डोळी-रेखीव-सडसडीत बांधा-हुशार, सतेज
अगदी कोवळ्या वयातच, महत्त्वाच्या पर्वाला सुरुवात झाली
त्या काळातील प्रथेनुसार घराचं झालं गोकुळ, मुला-बाळांनी
पण ईश्वर-कृपेने सर्व मुलं-मुली-नातवंडं-पतवंड गुणी निघाली
सा-याच लेकी-सुना मुल्य जपणा-या आनंदी आणि समाधानी
खडतर प्रवास असूनही, तो जिद्दीनं यशस्वी करून दाखविला
आयुष्यातील चढ-उतारांतूनही संसार-रथाचा समतोल साधला
खूपदा "दोन धृवावर दोघे आपण"अशीच परिस्थिती असताना
पूर्णतः भिन्न स्वभाव असूनही, संसार यशस्वी करुन दाखविला
संसाराचा गाडा पुढे हाकण्यासाठी, भक्कम आत्मविश्वास हवा
तो आई-काकांमध्ये पुरेपूर होता म्हणूनच प्रवास यशस्वी झाला
त्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबातील एकोपा कायम टिकून होता
त्यासाठी कैक अग्निदिव्यं, पार पाडावी लागली त्या माऊलीला
एखाद्या झाशीच्या राणीप्रमाणे तिने एकटीने रथ उचलून धरला
विपरीत परिस्थितीतही मनाचा समतोल किंचितही ढळू न दिला
आमच्या आई आणि काकांनी भर-भरून समृद्ध केले आम्हाला
तोड नाही, आयुष्यातील त्यांच्याबरोबर व्यतीत केलेल्या काळाला
निव्वळ जन्मो-जन्मांच्या पूर्व-पुण्याईने, असे माता-पिता लाभले
म्हणून प्रत्येक दिवसाला त्या भगवंताचे लक्ष-लक्ष आभार मानले
कर्म-धर्म-संयोगाने १४ जुलै रोजी असतो स्मृती-दिन, दोघांचाही
त्यांच्या आशिर्वादांनी सारे सुख-समृद्ध-शांत-तृप्त आहोत आम्ही
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply