कविता :🌷 ‘ या-सम-हा ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, १० जुलै २०२३
जन्मत:च अत्यंत बुद्धिमान, निव्वळ तेरा वर्षांचं वय असताना…
स्वतंत्रतेचं स्त्रोत्र-स्वदेशीचा फटका-सारसंग्रहादी अद्भुत रचना !
इतकी अथांग देशनिष्ठा की निष्ठेलाही किंचित संकोच वाटावा…
इतकं निडर-अगाध-देशप्रेम की बर्फाळ पाण्याला घाम फुटावा !
बंदीवासात दररोज कोलूच्या-बैलांसारखं जुंपूनच तेल काढलं
राबराबून-काबाडकष्ट करुन अर्धपोटी-स्थितीतही लेखन केलं !
अंदमान-काळकोठडीत हरप्रकारे छळून-खड्या बेडीत टांगलं,
तेल-घाण्याला जुंपलं-नारळाचा काथ्या कुटण्याचं कामही केलं…
कारागृही लेखणी नसूनही कोळशाने भिंतींवर लिहिलं रात्र-रात्र…
लिहिली पुस्तकं, कविता, महाकाव्यं, ग्रंथ, नाटकं, आत्मचरित्र !
अंदमान-कारागृही बाभळीच्या काट्याने भिंतीवर कोरुन लिहीलं,
‘Essentials of Hindutva’ या अप्रतिम ग्रंथाचं लिखाण केलं !
देश-स्वातंत्र्य-प्राप्ती अन् ते मिळवल्यावर देशाच्या सुराज्यासाठी,
रात्रं-दिवस अतोनात अविश्रांत परिश्रम घेतले, जन-जागृतीसाठी !
खरोखरचे द्रष्टा असल्याने जातिभेद-निर्मूलनासाठी अस्पृश्यांसाठी,
आंतरजातीय-लग्नं लावून-‘पतित पावन मंदिरं’-उभारली सर्वांसाठी
सामाईक भोजनालयं सुरू करुन जातिभेद समूळ नष्ट करण्यासाठी,
भारतभर सर्वत्र सहभोजनाचा धडाका उडवून दिला सर्व-जनांसाठी !
निडरपणे ध्येयाच्या ध्यासाने वाटचाल केली, मृत्यूलाही न जुमानता !
भयंकर सागरात उडी घेऊन बर्फाळ पाण्यात-पोहत किनारा गाठला !
उभं-आयुष्य क्षणाचीही उसंत न घेता, देश-हितासाठी अखंड झटले
अंती ८३ व्या वर्षी प्रायोपवेशनाचा निर्णय घेऊन अन्न-पाणी त्यागले !
परिणामी, २६ फेब्रुवारी १९६६ त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले
भारत-भूचे-वीर सावरकर-नामक अनमोल-अस्सल-महारत्न लोपले !
‘मरावे परि किर्ती रूपे उरावे’ ही उक्ती लागू होते ज्या कुणा-कुणाला,
खचितच-‘वीर विनायक दामोदर सावरकर’या-असामान्य-नर-रत्नाला !
स्वेच्छेने देह ठेवूनही त्यांच्या महान्-कर्तृत्वाचा-डंका जगभर दुमदुमला
“झाले बहु होतील बहु परि या सम हा” कौल हाच एकदिलाने दिधला !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply