कविता – 🌷 ” मोल आणि अनमोल “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – १३ सप्टेंबर २०१७
” दाम करी काम वेडया दाम करी काम….”
प्रत्येक गोष्टीला “मोल” नक्की असतं,
पण ती “अनमोल” असेलच असे नाही.
आईची कूस, अनमोल …
तिने केलेलं संगोपन अनमोल…
तिचे संस्कार बहुमोल …
तिचं ऋण, अनमोल …
याउलट पाळणाघर, जरूरीचं अन् मोलाचंही …
पण ‘ मामला मात्र सोयीचा ‘…
वडीलांचं छत्र कणखर, प्रेमळ व मजबूत …
चिमुकल्या हातात घट्ट पकडलेलं त्यांचं बोट,
त्या इवल्याश्या जीवाला किती आश्वस्त करणारं …
एखाद्या काका-मामा-दादा याचा सहवास
मोलाचा, पण बाबांची सर त्यास खचितच नाही …
पोटाला चिमटा घेऊन, काटकसर करून,
मुलांचं उच्च शिक्षण, त्यासाठी परदेशी गमन
यासर्व गोष्टीचं ” शिव-धनुष्य ” पेलणं …
केवळ अनमोल, त्यास तोडच नाही …
त्याची सर, बँका-पतपेढ्या
यांच्या दसपट कर्जाला,
कदापि येणे नाही …
वेळोवेळी आप्त-स्वकीय-मित्र-मैत्रिणींचं मार्गदर्शन जरी ‘मोलाचं ‘ तरी
” वेळीच ” पोट-तिडकीने दिलेला
जन्मदात्यांचा अनमोल सल्ला …
केवळ बहुमोल …
दुष्काळ-ग्रस्त शेतकऱ्यांना ” वेळीच ” केलेली मदत,
अनमोल …
वैफल्य-ग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्मघातानंतर,
मूठभर पैसा व ढीगभर आश्वासनं,
एकदम फोल व म्हणून निंदनीय …
बैल गेला अन झोपा केला, अशातली गत …
महापुरात शेतं-गावं-गुरं-ढोरं
सर्व वाहून नष्ट होताना,
दिलेला मदतीचा हात,
अनमोल …
पुराच्या ठिकाणी मंत्री-संत्री भेट देणार,
विमानातून थोडी अन्नाची पाकिटं फेकणार …
केवळ ढोंग, दिखावा अन वरवरची मलमपट्टी …
एकदम फोल …
भूकंम्प-विषयी पूर्व-सूचक अद्यावत यंत्रणा
” वेळीच ” बसवून-वापर करून धोका टाळणं,
नक्कीच बहुमोल …
याउलट भूकंम्प-ग्रस्तांच्या प्रश्नावर नुस्ती चर्चा-चर्वणं, अन् वायफळ उहापोह …
एकदम फोल म्हणून आक्षेपार्ह …
परिस्थितीवश, शिक्षण मनाजोगतं न झालं,
तरी आपल्या भावंडांना, मुलाबाळांना ते उपलब्ध
करून देणं …
त्यासाठी कांही अंशी, सक्ती सुध्दा करणं,
अत्यंत बहुमोल …
म्हणून अतिशय वाखाणण्याजोगं …
भुकेजलेल्या गोर-गरीब,
अंध, अपंग, अनाथ-जना,
“यथाशक्ति”, झाकल्या-मुठीने
अन्न-दान, विद्यादान करणे,
अनमोल …
थोडक्यात काय,
मोल, अनमोल, बहुमोल …
सर्व एकाच नाण्याच्या अनेकानेक बाजू …
आपलं-आपणच ठरवायचं त्यांचं ” मोल-मोजमाप “
अन् त्यासाठी निवडायचा ” योग्य-तराजू ” …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏�🌷🕉
Leave a Reply