कविता – 🌷’ आधुनिक अष्ट-भुजा-देवी ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – १८ डिसेंबर २०१६ वेळ : १२ वाजून ५२ मि.
गेल्या आठवड्यात बिल्डिंगचा वॉचमन,
एका नव्या वयस्क-बाईला आला घेऊन
विचारातच पडले तिच्या वयाकडे पाहून
त्यामुळं मनस्थिती थोडीशी दोलायमान
काम अगदी स्वच्छ, पण बडबड फार
जणू हात व तोंड बरोबरच चालवणार
हां हां म्हणता कामांचा डोंगर केला पार
उरक जरी दांडगा, चौकशांनी केलं बेजार
वयापरत्वे नवरा कामावरुन रिटायर झाला
नातू इंजिनियरिंगला-लेक कॉम्पुटरकोर्सला
काबाडकष्टाने स्वतःचं घरदार चालवते आहे
जणू अष्ट-भुजा-देवीचा-अवतार वाटते आहे
ज्या वयात बायका “थकले बाई ” म्हणंत,
हळूहळू उठतात, “राहिलं काय आयुष्यात”
असं म्हणत, दीर्घ नि:श्वास टाकत बसतात
पन्नास गेले-पाच राहिले-पालुपद लावतात
ही बाई म्हणजे, बरोब्बर उलटाच प्रकार
प्रसन्न चेहरा, तरुणीसमान उदंड उत्साह
वेगात हालचाल, कामाचा नुस्ता धबधबा
पाच गेले मजेत-पन्नास जातील आनंदात
एवढं सगळं करून सर्व कामं सांभाळून,
भजन- किर्तन, मनाचे श्लोक पाठ करणं
परिस्थितीस हसत तोंड देत सामोरं जाणं
नशिबाला, नवऱ्याला जराही दोष न देणं
तिचं सगळं काही वाखाणण्या-जोगं आहे
कसलीही अपेक्षा न ठेवता जगत आहे
हसत-मुखानं-जीवन जगण्याच्या कलेमुळे,
नव-गुरुची भर पडण्याची, शक्यता आहे
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply