कविता : 🌷” मुद्दतें हो गयीं “…

तारिख – ७ जानेवारी २०१७

कवितेचं नाव-🌷” मुद्दतें हो गयीं “…
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
रियुनियन-कार्यक्रमाचा “डी-डे ” उगवला …
सारी रात्र जागून,विश्वासनी हॉल सजवला …

मुंबईला,लाम्बून आलेली मंडळी,
आदल्या दिवशीच पोचली होती …

पुणे,गोवा,नाशिक,सोलापूर,चिकमंगळूर,
येथपासून आलेली मंडळी,होती जोशात

ठरलेल्या वेळी सकाळीच,जमले सर्वजण 
फोटोग्राफर,लाईट्सपासून, म्युझिकपर्यंत,
सगळ्या गोष्टिंचं उत्कृष्ट होतं व्यवस्थापन  

प्रवेश-द्वारी अत्तर,गुलाब-जलाचा छिडकाव 
थोडं पुढे, सुगंधी फुलं-पाकळ्यांचाच वर्षाव 

त्यापुढं पुरुषांना एक-लाल-गुलाब,भेट
स्त्रियांना मोगऱ्याचा मस्त- गजरा-भेट

त्यानंतर वाईच्या-कंदी-पेढ्याचा पुडा,
थाट पाहून, लग्नाचा घाटच आठवावा

हॉलमधे सनई,चौघडा,तबला,संतूर …
कानांवर पडत होते यांचे मिश्र-सूर …

हॉल मोठा होता म्हणून,त्याच्या अर्ध्या-भागात,
मांडणी,लोड-तक्क्या-गाद्यांची भारतीय बैठक
दुसऱ्यात, टेबल-खुर्च्या-ट्रे अशी विदेशी पद्धत

विश्वास, रमेश व अस्मादिक आयोजक …
त्यामुळं प्रत्येकाचं जातीनं,आगत-स्वागत …

स्वागत करून आगतास,
नाष्टयाच्या भागात नेऊन,
पाणी,सरबत,कैरीचं पन्हं,
मठ्ठा,लस्सी अथवा पियुष …

नाष्टयात साबुदाणा खिचडी,
उपमा व बटाटा पोहे,चटणी
असा बेत अस्सल ब्राह्मणी …

गप्पा मारत, न्याहरी करून,
सर्व झाले जेव्हा स्थानापन्न,

सगळ्यांच्याच प्रेमळ- आग्रहांनं,
अस्मादिकांनी केलं,सूत्र-संचालन …

सर्वप्रथम जे आम्हा सोडून,महा-प्रवासा गेले,
त्या सर्वांना स्मरून,दोन मिनिटं,प्रार्थना केली 

मग उपस्थितांना एकेकास बोलावून,
ठळक माहीती माईकमध्ये,विचारून,
तो एक गंमतीचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम …

नंतर जोक्स,कविता वाचन …
कथा-कथन असे मनोरंजक
भाग होताच,जेवणाची पंगत …

आमरस-पुरी,डाळिंब्यांची उसळ,मसाले-भात,
रायतं,खमंग काकडी,चटणी,अळू व पंचामृत
साग्र-संगीत पण सगळ्यांना आवडेलसा बेत 
प्रत्येकास आग्रहानं वाढण्याचं आवडतं काम,
अस्मादिकांचं …

सगळ्यांना विडा,तंबुल,मुखवास,बडीशोप
सर्व काही हवं-नको देऊन, शाळेचा स्टाफ,
सफाई कर्मचारी,इत्यादींना,मग वाढून दिलं …

मग ग्रूप-फोटो काढले,
सर्व-वेळ फोटोग्राफर,
विविध क्षण टिपतच,
होता व कॅमेऱ्यात बंद
होता,त्याना करून ठेवत …

नंतर गप्पा,भेंड्या, गाणी अंताक्षरी …
म्युसिकल-चेअर अशा खेळांची बारी

संध्याकाळी चहा,कॉफी,समोसा,खमण
अन गरमागरम बटाटे-वड्याचा आस्वाद
एकूणच जमलेली मंडळी एकदम खुश
शेवटी आभार-प्रदर्शन चार शब्द बोलून

प्रत्येकास कार्यक्रमाची गोड-स्मृती म्हणून
आमचा अकरावीचा ग्रुप-फोटो लॅमिनेटेड,
नवा ताजा-ग्रुप-फोटो,खाऊ व मेमरी-बँक,

दरवर्षी आता नक्की भेटण्याचं प्रॉमिस …
या ” नोटवर ” लांबच्यांनी निरोप घेतला …
जवळच्यांनी अधिक वेळ गप्पा मारल्या

खूप छान रंगला कार्यक्रम
जसा व्हायला हवा, तसाच
तो प्रत्यक्षात झाला म्हणून
आयोजनाचं खूप समाधान …

आम्हाला, क्रेडिट सगळ्यांनी जरी दिलं,
तरी मुख्यतः विश्वासच त्यास होता पात्र,
माझी आरतीला फक्त,चार बोटांची साथ …

आज जर मागे वळून पाहिलं,तर
त्या ग्रुप- फोटोत असलेल्यांतून,

कमीत- कमी पाच-सहा जण
हे जगच सोडून गेलेले आहेेत …

अगदी उत्साहाचा धबधबा, 
असलेल्या विश्वास- सकट
गोड-गळ्याच्या शशी- सकट …

खटाटोप करून,
ज्यानं गोड-आठवणींचा हा संग्रह दिला,
तो विश्वास सुद्धा,
त्याच्या कॅन्सरच्या लढाईत कामी आला …

आज सोचा तो आंसू भर आए …
मुद्दतें हो गयीं, हम सबसे मिलें …




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!