कविता – 🌷 ” मातृ-भाषेचे ऋण ”
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – सोमवार, २४ जून २०१७
मातृ-भाषेचे ते प्रचंड शब्द-वैभव अनुभवुनी,
मराठी-ऊर अभिमानाने अक्षरशः येतो भरुनी…
प्रत्येक मराठी-मनाचा हर्ष सदा दुथडी भरुनी…
मातृभाषेवरील प्रेमाने- जाई पुरताच ओसंडूनी…
असे असूनही,
इंग्रजाळलेल्या पिढीची अशुध्द-धेडगुजरी बोली…
ऐकता, नेमकी ही भाषा कोणती-दाट शंका येई…
माय-मराठीची ती भ्रष्ट-स्वरुपातील बोली ऐकूनी,
प्रत्येक स्वाभिमानी काळजाचं होई,”पाणी-पाणी” …
फॅशन म्हणून चार-चौघात, भाषेची बूज न राखी…
ही मराठी-जन-मानसाची व्यथाच-बोचरी-दुखरी…
तोडके-मोडके चुकीचे इंग्रजी बोलून धन्य वाटणे…
उसन्या कुबड्या घेत, काय जीणे ते लाजिर-वाणे…!
जगभरात या लोकांचे जेव्हा होत्याचे नव्हते होते,
तेंव्हा मात्र अशा लोकांच्या “तोंडचे पाणीच पळते”…!
मराठी शिकून-बोलून तयार होतील लखलखते हिरे…
स्वच्छ-सुस्पष्ट-उच्चार, वाणीवर होती संस्कार गहिरे…
मायबोलीचा यथार्थ सन्मान करण्याचे होता सुसंस्कार,
खात्रीने सर्व बाल-मनांना देतील सुंदर-सुयोग्य-आकार !
म्हणूनच अत्यावश्यक, मातृभाषा-माध्यमातून शिक्षण…
त्याशिवाय फेडू न शकणार आपण, मातृ-भाषेचे ऋण…
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply