कविता – 🌷 ‘ मनाचा बहर ‘


कविता - 🌷 ‘ मनाचा बहर ‘
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - गुरुवार, ४ नोव्हेंबर २०२१

वसंतात झाडं-वेली, नद्या-झरे अवघी सृष्टी बहरते,
अगदी तस्सेच मानवी-मनही फळते-फुलते-बहरते !

लहानपणी जसं मनपसंत खेळणं मिळाल्यावरती,
आठवतं, निरागस आनंदाला कित्ती उधाण यायचं  !

मना विरुध्द झाल्यावर ओघळायचे टप्-टप् मोती,
पण आईच्या कुशीत ते सारं काही विसरलं जायचं !

शाळेत पहिला नंबर आल्यावर मन पुरतं बहरायचं,
घराच्या-आईच्या ओढीने आनंदाने थुई-थुई नाचायचं !

कॉलेजात मित्रमैत्रीणींबरोबर धमाल-मस्ती करताना,
एका वेगळ्या अनोख्या विश्वात गेल्यासारखं, रमायचं !

लग्नाआधीच्या गोड हुरहुरीच्या दिवसात तेच वेडं मन,
जणू पक्षा-सम आकाशात, उंच-च-उंच झोके घ्यायचं !

लग्नानंतरच्या मधुमासात, विनाकारणच ते हसायचं,
नव्या गोड-गुलाबी-दुनियेत रंगून, देहभान हरपायचं !

संसारी रममाण होऊन, इवल्याशा जीवाच्या चाहूलीनं,
कापसासारखं मऊ-मृदु होऊन, भावी स्वप्नं रंगवायचं !

सारं स्थिर-स्थावर झाल्यावर काहीसं बिनधास्त होऊन
क्षणा-क्षणाचा आस्वाद घेत, चवीनं आयुष्य जगायचं !

जीवनाच्या संध्या-समयी मात्र अंतर्मुख होत, कृतज्ञतेनं
आंतरिक ॐकाराचा मागोवा घेत-घेत कृतकृत्य व्हायचं !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!