कविता- 🌷 "मन:शांती "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - रविवार, १९ मार्च २०१७
एका गोष्टीची खात्री शंभर टक्के अगदी...
गेल्या, शत-जन्मांतरी एखादं काहीतरी
पुण्यकर्म हातून झालं असावं हे नक्की
त्याशिवाय इतक्या साध्या-सरळ-महान
आई-वडिलांच्या पोटी जन्म घेता येऊन
त्यांचा सहवास-लाभ,संस्कार,मार्गदर्शन
माझी आई जी आद्य-गुरू,तिच्या विषयी
कितीही लिहीलं तरी कमीच वाटेल नेहमी
व्यक्ति जी रात्रंदिवस नजरे-समोरच दिसते
बर्याचदा त्या व्यक्तीलाच गृहीत धरले जाते
आईचं नाव "शांता", नावाप्रमाणेच स्वभाव
साधी राहणी, सच्ची कृती व तारतम्य-भाव
लाखांमध्ये एखाद्या व्यक्तीत इतके सर्व गुण
शोधून-शोधून, व्यक्तीत मिळणं कर्मकठीण
जे भाग्यानं,पदरी आहे त्यातच सदा आनंदी
असिम-कष्टांची पर्वा कधीच करायची नाही
किती संकटं आली, तोंडातून चकार,ब्रं नाही
कर्तव्य करण्यात कधी कुचराई माहीत नाही
स्वकर्तव्य काटेकोरपणे सदैव आनंदाने करी
कोणत्याही त्रुटिंनी तिला फरक पडला नाही
आखलेल्या नियमबद्ध जीवनी तृप्त होती ती
कोणत्याच गोष्टींनी मन:शांती ढळू दिली नाही
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply