कविता – 🌷 ” मदत-दाता ”
कवयित्री- तिलोत्तमा विजय लेले
तारिख – १४ डिसेंबर २०१६
फ्रँकफर्टहून पॅरिसला गेलो होतो, पॅरिसच्या मध्यवर्ती भागात आमचं वास्तव्य
सर्व प्रेक्षणीय स्थळं अगदी हाकेच्या अंतरावर
रोज फिरत-फिरत, तब्बेतीनं एकेक स्थळ सुशागात पाहणं
रेस्तराँमध्ये, काचेतून रस्त्याकडे बघत, मजेत खाणं-पिणं !
एकदम मस्त कार्यक्रम चालला होता मध्यंतरी फ्री-कुपॉन्स मिळाली आम्हाला
ती कधी वापरायची,प्रश्न “गहन”होता-प्लॅन “व्हर्साय-पॅलेस” ला जायचा ठरला
चक्क एका दगडात दोन-तीन पक्षी-फ्री-कुपॉन्सचा वापर निदान-पक्षी !
सर्वांनाच फ्री-गोष्ट एवढी प्रिय का-खास करून आम्हा,महिला-वर्गाला !
एक भला-मोठा न सुटणारा यक्ष-प्रश्न हा …
खरं म्हटलं तर,फ्री वगैरे काही मिळत नसतं, त्या साऱ्या “मार्केटिंग-गिमिक्स” असतात
हे माहीत असूनही,फ्रीचा मोह,नाही आवरत …
सकाळी लवकर उठून,हेवी-ब्रंच करून, आम्ही गेलो पॅरिसच्या मेट्रो स्टेशन-वर
कुपॉन्स वापरून गेलो प्लॅटफॉर्मवर, पूर्ण स्टेशनभर फक्त फ्रेंच भाषेचा वापर !
लेखी वा बोली भाषा सगळीकडे फक्त एकच, आमचं फ्रेंच-ज्ञान तीन-चार जुजबी शब्द एवढंच
कुणाला इंग्रजीत विचारलं तर शांतपणे ऐकून, जे काही सांगायचे, ते नव्वद टक्के फ्रेंच असायचं
कधी न ऐकलेलंसं इंग्लिश, जे ‘गोलगोल’ फ्रेंच वाटायचं,
कानांना गोड जरी वाटलं, तरी समजणं कठीण असायचं
शेवटी टॉस करून गेलो एका प्लॅट-फॉर्मवर, गोंधळून नुकत्याच आलेल्या ट्रेनकडे पाहत
एवढ्यात एक प्रसन्न, हसरा माणूस,थेट माझ्यासमोर आला, मी इंग्लिश मध्ये विचारलं,
सूचना करण्याची विनंती केली, त्यावर वापरून,चक्क शुद्ध हिंदी,
“मुझे अंग्रेजी नहीं आती, पर मैं आपको हिंदीमें जरूर बताता हूँ” !
पॅरिसमध्ये प्रत्यक्ष परमेश्वर भेटीचा आनंद-आंधळा मागतो एक डोळा, मिळाले चक्क दोन
कारण फार कमी फ्रेंच लोक, इंग्रजी बोलतात, ते जे “फ़्रेंचाळलेलं इंग्लिश” बोलत सूटतात,
जीवाचे कान करूनही,ओ की ठो नाही समजत
खुद्द पॅरिसच्या प्लॅट-फॉर्मवर, चक्क शुद्ध हिंदीत बोलणारा,
“नॉलेजेबल माणूस,”मदतीला, माझा आनंद गगनात मावेना
त्याने खूप छान,सूचना दिल्या-व्हर्साय-पॅलेसला जाण्याच्या
कोणत्या स्टेशनला उतरणं …ते कोणत्या बाजूला येईल
ऐकल्यावर समजलं, आम्ही बरोबर विरुद्ध दिशेने गेलो असतो
त्याचे मनापासून आभार मानून, त्याच्या सूचना तंतोतंत पाळून,
खूपच रमलो व्हर्साय-पॅलेसला, संपूर्ण दिवस मस्त- मजेत गेला
आपल्या मैसुर-राज-महालाची आठवण झाली-कायम राहीली लक्षात ही सुंदर, कलाकृती
आजवरच्या आयुष्यात, दैवी-कृपेचे विलक्षण-अनेक-अनुभव आल्यामुळं असेल कदाचित,
प्रवासात अशी अनपेक्षित-प्रचिती नाही आली, तर थोडंसं चुकचुकल्या सारखं होतंच होतं
हे असं वाटणं,बरोबर की चूक, योग्य की अयोग्य ते अजिबात नाही माहित
पण कोणतीही गोष्ट करताना एक सार्थ-भक्कम विश्वास मात्र असतो गृहीत
सगळीकडे श्रीकृपेची-छत्र-छाया
रात्रंदिन तो विधाता, रक्षणकर्ता
सावली-सारखा सदा पाठीराखा
विभिन्न रूपात येई, “मदत-दाता”
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply