
कविता - 🌷 " भाव-विश्व "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
ओठांवर येऊनी शब्द,
ओठांतच पुन्हा ते विरले ...
पण डोळे भरून आले,
मूकपणाने बोलून गेले ...
मनात जपलेले चांदणे,
आतुर होऊन चमचमले ...
हळुवार भाव ते हृदयीचे,
विरहातच, वाहूनी गेले ...
श्रावण येतो घेऊन,
सुखद जलधारांचा संग ...
मनसोक्त भिजून चिंब,
आठवांच्या डोही तरंग ...
प्रीतीच्या पाऊल-खुणा,
घालती मनात रुंजी ...
आठवणींचा ठेवा हा,
मंजुळ स्वरांची पूंजी ...
आरसा समोर असता,
प्रतिबिंब तुझेच दिसते ...
भाव-विश्व आपलेसे,
अधिकच गडद होते ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply