कविता : 🌷’ भाग्यवंत ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शुक्रवार, दुपारी ४ वाजून १० मि.
आम्ही सगळेच आतुरतेने वाट बघायचो मे महिन्याची,
एक म्हणजे शाळेला भली मोठ्ठी सुट्टी-बुट्टी मिळायची,
अन् अजून जास्त लाड करायला आमची ताई यायची !
एरव्ही मुंबईपासून खूप लांब, हैद्राबादला ती राहायची !
आठवणीनं प्रत्येक सणाला पत्र व भेटकार्ड पाठवायची
काय बिशाद होती सणांची, तिच्या पत्रा आधी येण्याची !
संक्रांतीला ती इवल्या-इवल्याशा कापडी पिशव्यांमधून,
पाठवायची स्वतः केलेला नाजुक हलवा अन् तिळगूळ !
तिच्या भावना व शुभेच्छा त्याहूनही होत्या अधिक मधुर !
एका मेच्या सुट्टीत ताई नुकतीच हैद्राबादहून होती आली,
प्रवासानं दमूनही लगेच नवीन खाऊच्या तयारीला लागली
हे ऐकल्यावर आमची उत्सुकता थेट शिगेला होती पोचली
दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारीला ताईनं ‘इडली’ दिली,
“कशी झाली आहे ते सांग हं” म्हणंत प्रेमानं होती वाढली
अजाण वय-‘पोच’ नव्हता,”यक्”म्हणून धूम होती ठोकली !
आयुष्यात पहिल्यांदा खाल्लेली पहिलीच अशी ती इडली !
ताई मस्त ‘खाऊ’ देणार, आमची अपेक्षा होती उंचावलेली,
मस्त ‘खाऊ’च्या परिभाषेत बिल्कुल बसली नव्हती इडली !
आलेल्याच दिवशी रात्री तिनं इडलीची जय्यत तयारी केलेली
त्याकाळी घरी ना मिक्सर-ग्राईंडर ना होता रगडा, आणि तरी
पहाटे तीनला, चक्क पाट्या-वरवंट्यावर तिनं वाटावाटी केली !
भिजवलेले उकडे तांदूळ, बुळबुळीत उडीद-डाळ बारीक वाटणं,
म्हणजे काय ढोर-मेहनत असेल याची कल्पनाही नाही करवत !
काही अंशी होतेय् सर्वांसाठीच्या तिच्या अपार कष्टांची जाणीव !
चवी-चवीने उडुपीचे इडली-डोसा-उत्तप्पा वगैरे खाताना दर वेळी,
ताईची, तिनं केलेल्या लाडांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही
राहून-राहून “किती भाग्यवंत आहोत,” कायम जाणीव होते याची !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply