कविता :🌷 ” ख-या भक्तिचा तो भुकेला “


कविता :🌷 " ख-या भक्तिचा तो भुकेला "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

ख-या-भक्तिचाच तो सदैव असतो भुकेला
भक्तांच्या मूक-हाकेला, सदाच धावून गेला
ज्ञानदेवांसाठी रेड्याच्या मुखे वेदमंत्र वदला
ज्ञानेश्वरीमधून मराठी-भाषेत अवगत झाला...

जुलुमानं अभंग-पोथ्या नदीत फेकून दिलेल्या,
संत-सज्जन-अंत:करणाच्या, ठिक-या झाल्या
तुकारामांच्या अभंगांचा, जळी सांभाळ केला
अद्भुत-अभंगवाणीचा विनाश लीलया टाळला...

रात्रंदिन ईश्वराची आळवणी करणा-या जनीला
दळण-कांडण करुनी कामात हातभार लावला
संतांच्या-घरी पाणक्या बनून-सेवा करत राहिला
दास होऊन श्रीहरी, भक्तांसाठी झटतच राहिला...

कबीरा-घरी शालू-शेले विणून, मदत-रूप झाला
संशयी-राणानं विषाचा प्याला मीराबाईला दिला
विष-पेयाचं अमृत करुनी मीरेचा जीव वाचविला
तिच्या भजन-गीतांतून, सदैव प्रकट होत राहीला...

एकनाथांनी आणलेले गंगा-जल पिण्याकरिता
मरणासन्न गर्दभाच्या रुपात प्रकटला तो दाता
महालाची पंचपक्वान्ने सोडून निभावली मित्रता,
मित्र सुदाम्याच्या पोह्यांचा आनंद लुटता-लुटता...

तुकारामांच्या भेटीला शिवाजी-राजे गेले होते,
संधी-साधून मुघल सैनिकही तिकडे पोहोचले
हे पाहून तुकारामांनी विठ्ठलाला सांकडे घातले,
सर्वच-श्रोते एकसे दिसले, राजे सुखरुप राहीले...

अगणित आहेत भक्ति-रसाच्या विलक्षण गोष्टी
जोवर आहेत सूर्य-चंद्र-ग्रह-तारे व अवघी सृष्टी
कधीही-कुठेही-कुणाच्यातरी रुपात मदतीसाठी,
भक्त असता संकटी, धावून सोडवितो जगजेठी...

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!