कविता – 🌷 ” बाप्पाचं मनोगत “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – ६ सप्टेंबर २०१६
प्रत्येक जण येतो, मला सांकडं घालतो
कधी कोणी मणभर सोन्यानं ही मढवतो
तर कधी कोणी चांदीची ‘ तुला ‘सुद्धा करतो !
जितके भक्त तितके नानाविध प्रकार …
कुणा एकीला हवा ” नवलखा हार ”
तर कुणाला हवी नवी, महागडी कार …
सारा येऊन जाऊन फक्त व्यवहार …
मी बाप्पाला हे देईन अन् ते देईन …
सुरुवात होते ती, ” मी एक-भुक्त राहीन “
अथवा ” दिवसभर मी अगदी उपाशी राहीन”
मग मजल जाते ती थेट, ” मी निर्जळी करीन” !
हर एक जण म्हणतोय ” बाप्पा तू मला पाव “
मग भले तो कोणीही असो, रंक अथवा राव
अगदी असला जरी तो अट्टल चोर अथवा साव
कोणताही असो त्यांचा प्रदेश, शहर अथवा गाव …
करतात धावा, ” देवा धाव रे धाव “…
कुणी नाही विचारत, ” देवा, तुला काय हवं….”
सहन करूनही महागाईचा बेसुमार भडीमार,
प्रत्येक प्रसादात तेल, तूप अन साखरच फार !
का हो वाढविता तुमच्या-माझ्या तनुचा भार ?
लोकल चुकल्यावर, बॉसला द्याल कारणं हजार
नको वाह्यात नाचगाणी अन् नको कर्कश्य लाऊड-स्पीकर …
नको फटाक्यांचे कर्कश आवाज अन् गुदमरून टाकणारा धूर …
नको त्या वाजत-गाजत मिरवणुका, नाहक पैश्यांचा चक्काचूर …
म्हणायला सगळेच भक्त, पण खरी भक्ति मात्र शून्य …
रोषणाई करून त्यांना वाटतं, जीवन झालं धन्य …!
पाण्यासारखा पैसा खर्चून, होतात “धन्य-धन्य”…!
मला प्रसन्न करण्याचे, आता तरी शोधा मार्ग अन्य
आता बाप्पाच करतोय विनवणी भक्तजनांना …
लक्ष द्या, छाटून टाका साऱ्या वायफळ गोष्टींना …
सण म्हणजे मना-मनातील आनंदोत्सव…
त्यासाठी करु नका त्या निसर्गाला ऊपद्रव…
टिळकांनी ज्या उदात्त हेतूनी सुरु केली ही प्रथा …
सद्य-भ्रष्ट-रूप पाहून, लाजच वाटेल की हो आता…
आप्त स्वकीय जमवून बांधा ” मानस-पूजा “…
असू नये कधी फुकाचाच गाजावाजा…
नैसर्गिक गोष्टी प्रिय-मज, बेत असावा साधा…
साजरा करा सण असा, अन् चाखा खरी मजा …
खोट्याचा लवलेश नको, कृत्रिम-पणाची मज बाधा …
नको बडेजाव, साधेपणातली काही औरच मजा…
छोटिशी बाळस्वरूप-मूर्ती स्वयं हाती बनवा…
त्यालाच शेंदूर, हळद अथवा हिरवा पाला लावा…
नैवेद्यास दूध, दही, गूळ-खोबरं किंवा सुका-मेवा…
मी आणि अवघी निसर्ग-देवता प्रसन्न होऊ तेव्हा …!
विसरून जा पूर्वी जेजे झाले, गेले अन केले…
आता जर निसर्ग-दत्त गोष्टीनी माझे पूजन केले,
जिथे दोन हस्तक व एक मस्तक असे झुकलेले,
तेथे माझे ” वास्तव्य ” नक्कीच असते ठरलेले …
तेथेच माझे ” वास्तव्य ” नक्कीच असते ठरलेले …!
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌷🕉🌅
Leave a Reply