कविता : 🌷” फुलोरा “

कविता : 🌷" फुलोरा "

कविता : 🌷" फुलोरा "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले 

मनासह मानवी पंच-ज्ञानेंद्रियांना सदैव सुखावणारा
रंग-गंध-स्पर्श-कान-जिव्हा यांच्यासाठीच हा फुलोरा !

मोरपंखी पिसं फुलवून नजर खिळवून ठेवणारा पिसारा 
लांडोरचं लक्ष वेधून घेऊन, पूर्णपणे आकर्षित करणारा

केकारव करतो-नर्तनही-करतो, फुलवून पिसांचा-फुलोरा, 
मन वळवून लांडोरला राजी करण्याचा प्रणयाचा फुलोरा 

गोंडस-निरागस-बाळांच्या मधाळ हास्याचा मुग्ध फुलोरा 
उंबरठ्यावर तारुण्य,किशोरींच्या लज्जेचा मोहक फुलोरा

प्रतिसाद पुलंच्या दर्जेदार खुसखुशीत लेखन वक्तव्याला,
सभागृही खसखस पिकली असतानाचा विनोदी फुलोरा 

ऋतुराजाच्या येण्याने बाग-बगीचा-कुंड्या-गच्ची-व्हरांडा
वृक्ष-वेलींवर सप्तरंगात न्हाऊन निघालेला स्वर्गीय फुलोरा !

पावसाची सर पडून गेल्यावर पाना-पानावर थेंबांचा नजारा
हलक्या हिम-वर्षावानं पूर्ण सृष्टी कवेत घेणारा शुभ्र फुलोरा !

सोनसळी श्रावणाच्या पिवळ्या-धम्मक उन्हाचा सोनेरी फुलोरा
हेमंत-ऋतु-आगमनाची वर्दी देणा-या शीत-शिरशिरींचा फुलोरा

ताटातूटी नंतर माय-लेक-भेटीचा हृदय-स्पर्शी वात्सल्य फुलोरा
भाऊबीजेला भावाची वाट पाहणार्या बहिणीच्या मायेचा फुलोरा 

चेहरा हसरा-मन काळजी-ग्रस्त अशा पितृ-प्रेमाचा सुप्त फुलोरा 
गर्द काळ्या अंबरात चमचमणार्या अगणित चांदण्यांचा फुलोरा 

आषाढी-कार्तिकीला चंद्रभागेच्या-तीरी, वारकरी संप्रदायाचा डेरा
"विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल"जयघोषात भक्ती-भावाचा फुलोरा 

दृष्य-अदृष्य भाव-भावनांचा-संवेदनांचा, कुणी खेळ मांडला सारा?
जन्मापासून अनंतापर्यंत क्षणो-क्षणी बदलंत राहणार आहे फुलोरा !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!