कविता : 🌷 ‘ प्रेरणा ‘

कविता : 🌷’ प्रेरणा ‘

कवयित्री तिलोत्तमा विजय लेले
तारिख : बुधवार, ८ मार्च २०२३
वेळ : १२ वाजून ३० मि.
जगभरात स्त्रीला समान-वेतन, मतदान-हक्क नव्हता मिळाला,
8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमधे स्त्री-कामगारांनी मोर्चा काढला,
त्या स्मरणार्थ हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारला गेला 
जागतिक स्तरावर स्त्री-हक्कांसाठी हा दिवस साजरा केला गेला
स्त्रियांसाठी हा दिवस सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा 
डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, अंतराळवीरादि होऊन गाजवायचा
सावित्रीबाई फुले, डॉ.आनंदीबाई जोशी आदि सर्वांना स्मरण्याचा 
त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वकर्तृत्वाने जीवन सफल करण्याचा !
प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीशी एक स्त्री असते
प्रसंगी निडरपणे सामोरे जाऊन त्याची ढालही होते !
बालपणी सुसंस्कारित करुन जगण्याची प्रेरणा देते,
लालन-पालनासह ध्येय बिंबवून, मनोबल वाढवते !
सत्ययुगात पुरुषांनी स्त्रीला कायम दुय्यम स्थानी मानले
वरवरच्या मान-सन्मानाखाली सर्रास कैक अन्याय केले!
कुशाग्र बुद्धीच्या चाणक्यांनी स्त्रीचे सुप्त-गुण होते हेरले,
स्त्री-प्रगती हीच समाज-प्रगती हे चाणक्य नीतीत कथिले !
स्त्रीविना कुटुंब पूर्ण होत नाही, सुदृढ कुटुंबांशिवाय समाज नाही
संयम, धैर्य, जिज्ञासा, अखंड प्रेमाचा व प्रेरणेचा स्त्रोत असते स्त्री,
अशा सुशिक्षित, कर्तबगार, हुशार स्त्रीमुळे कुटुंबाचं कल्याण होई
भावी पिढ्यांच्या-ओघाने संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी ठाम उभी !
प्रत्येक स्त्रीने संधी मिळता, पूर्ण झोकून देऊन संधीचं सोनं केलं
आपापल्या क्षेत्रात अग्रेसर राहून, कौटुंबिक कर्तव्यही निभावलं 
राणी लक्ष्मीबाईंनी दत्तक मुलाला पोटाशी बांधून रणांगण गाजवलं !
जिजाऊंच्या प्रेरणेमुळे शिवरायांनी मराठ्यांचं साम्राज्य उभं केलं !
प्रत्येक स्त्रीला मातेसमान मानतो, तो जिजाऊंचा शिवबा होतो !
योगबळाने पाठीवर मांडे करु देतो, तो मुक्ताईचा ज्ञानदेव होतो 
सखीला जीवाभावाची सदा साथ देतो, तो राधेचा श्याम होतो,
लीलया शिवधनुष्याची प्रत्यंचा ओढतो, तो सीतापति राम होतो !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!