कविता -🌷 ” प्रेमाचा वाहता निर्झर “


कविता -🌷 " प्रेमाचा वाहता निर्झर "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

भारतीय संस्कृतीत भावा-बहिणी मधील पवित्र नात्याचे बंध
जगभरात सर्वत्र "नर आणि मादा" एवढेच प्रमुख नाते-संबंध

भावा-बहिणीच्या कोमल भावनांचा उत्सव म्हणून रक्षाबंधन
श्रावण-पौर्णिमेस,प्रचंड उत्साहात सर्वत्र साजरा होई हा सण

पूजेच्या ताटात हळद-कुंकू-सुपारी-राखी-अक्षता व निरांजन
नटून-थटून बहिण करते भावांचे, आरती ओवाळूनी औक्षण

पूजा-आरती, नमस्कार-आशिर्वादानंतर तोंड गोड केले जाते
भावासाठी ती गोडधोड-पंचपक्वान्नांचे सुग्रास जेवण बनविते

बहिण-भावाच्या प्रेमाचे-मायेचे प्रतिक म्हणजे राखी-पौर्णिमा
राखीसह बहिणीची, भावांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना

राखी हे"रक्षा-सूत्र"जणू आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन
राखी करी भावा-बहिणीमधील अतुट नात्याचं-सौहार्दाचं दर्शन

लहान असो वा मोठे,किती भांडाभांडी करो,मायेला तोडच नाही
मायेची ओढ इतकी की त्यांना एकमेकां-शिवाय चैन पडत नाही

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या विशुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर
ते दोघेही प्रेरक-पोषक आणि पूरक आहेत, एकमेकांना परस्पर

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!