कविता- 🌷 ” प्रितीची रंगत ” तारिख – ३१ जुलै २०१५

कविता- 🌷 ” प्रितीची रंगत “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – ३१ जुलै २०१५
वेळ – संध्याकाळी ६ वाजून ९ मि.

पावसाचं आणि धरणीचं, 
झालं कडाक्याचं भांडण …
हिरमुसलेल्या धरणीचं मग
सुरुच झालं रुसणं-फुगणं …

“कधीच नाही भेटणार तुला,”
तणतणत पाऊस गेला सांगून …
त्यावर धरणी म्हणाली त्याला,
“नंतर मुकाट्यानं येशील मागून”…!

रागा-रागाने पाऊस आपले, घेऊन गेला ढग
“म्हणाला आता जिरवीन, धरेची सगळी रग” !

रागावून बसली धरणी, सुकून गेल्या वृक्ष-वेली…
मग तिच्या सौंदर्याची, पार रयाच की हो गेली ..!

तिचं असं रूप पाहून, पावसाला आलं भरून …
“काय असतो उपयोग, उगीचच भांडण उकरुन” ..!

मनातल्या मनात आतून, धरणी खूप होती झुरंत …
“पावसा, ये ना रे धावंत”, मनी याचना होती करंत …!

शेवटी न राहावून, पावसानं मग ढग केले गोळा …
थाऱ्यावर नव्हते चित्त, त्याचा भाव साधाभोळा …!

वाऱ्यावर स्वार होऊन, जलद आला तो तिच्यासाठी
बिलगताच धरणीला, लाजून पुरती गंधाळली माती …!

त्याच्या स्पर्शाने चिंब-चिंब, तिचे शहारले सारे अंग …
पुन्हा शोभला धरेवर, तिचा हिरवा-हिरवा-गार रंग …!

धरणी म्हणाली पावसाला,”पुन्हा कधीच नको रे भांडू” …
“विरहात सख्या उगा, पुन्हा माझे असे अश्रू नको सांडू” …!

“लुटुपुटुचं भांडण”पाऊस म्हणे, गालातल्या गालात हसंत… 
कधीमधी प्रितीची वाढवी रंगत-त्यात दडलीय् खरी गंमत…!

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆




























































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!