कविता – 🌷 ‘ प्रति – ईश्वर ‘

कविता - 🌷 ' प्रति - ईश्वर '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
 
देव प्रत्येक ठिकाणी काही जाऊ शकत  नाही,
म्हणूनच बहुधा त्या ईश्वराने निर्मिली आहे आई

आई या शब्दात 'आ' म्हणजे आत्मा-अर्भकाचा
'ई' म्हणजे त्या बाळाप्रति- ईश्वरासम-भाव-तिचा

आई ही व्यक्ती असली तरी 'आईपण'आहे वृत्ती
ही भावना उपजतच असते प्रत्येक स्त्रिच्या ठायी

अगदी चिमुरडी मुलगी पण खेळातील बाहुलीची,
जणू आईच बनून तिची घेते सर्वतोपरी काळजी

तिला न्हाऊ माखू घालते, नटवते, लाडही पुरवते
केसांची वेणी घालून तिला शाळेसाठी तयार करते

जे तिची आई तिला करते, ती बाहुलीलाही करते
हे शिकवावे लागत नाही, तिच्यात जन्मतः असते

याने सिद्ध होते-मातृत्व-भावना, जन्मजात असते
अन्य नात्यांहून,प्रत्येक स्त्री सर्वप्रथम माता असते

संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी आई असते
सगळ्या भावंडांमधला प्रमुख दुवा पण तीच असते

प्रेम-वात्सल्य-माया-ममता-शिस्त तिच्यात दडलेले
एकोपा-शांती-बंधुत्व-सहृदयता सामावलेली असते

सोशिकता, कणखरपणा बिंबवणारी श्यामची आई,
श्री रामचंद्रावर सुसंस्कार करणारी, कौसल्या आई

तान्ह्याला पाठीशी बांधून लढणारी राणी लक्ष्मीबाई
मदर तेरेसा, अजाण्या देशात जाऊन सेवा करणारी

हिंदू-प्रतिपालक-म-हाठा-साम्राज्य स्थापनेची प्रेरणा
जन्मापासूनच तसे सुसंस्कार करणा-या जिजामाता

जगभरात कित्येक अशा महान माता जन्मा आल्या
म्हणूनच सुसंस्कृत सुशिक्षित समाज निर्माण झाला

कुटुंब-समाजासाठी त्याग-समर्पण करणाऱ्या माता
त्यांच्या अथक परिश्रम-सन्मानासाठी त्रिवार मुजरा

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!