कविता : 🌷’ पूर्णत्व ‘
कवयित्री :तिलोत्तमा विजय लेले
तारिख : २१ मार्च २०२३
आज काय तर अमुक दिवस साजरा
अन् उद्या काय तमुक दिवस गोजीरा
बघायला तर प्रत्येक दिवसाचा चेहरा,
थेट थुई-थुई नाचणा-या मोरासारखा !
वाटतोही तेवढाच सुंदर-आल्हाददायी
माझ्यासारख्या अनेकानेक लोकांसाठी,
प्रत्येक दिन असतोच मुळी ‘कविता-दिन’
कारण कविता वसते ध्यानी-मनी-स्वप्नी !
कविता मनात, विचारात आणि आचरणात
रक्तासह जणू कविता वाहते नसा-नसात !
कविता अंतरंगात, कविता बाह्य-स्वरुपात
प्राणवायू सारखी जरुरी ती, रोमा-रोमात !
सृष्टीच्या विविध रुपातून कविता प्रकटते
कधी वा-यासवे बागडते, कळीसंगे डोलते !
तर कधी फुला-फुलातून खट्याळपणे हसते
कधी अंबरात पाखरांसंगे उंच उंच झेपावते !
ती कधी गाईच्या आर्त हंबरण्यातून डोकावते
दुग्धपान करणार्या वासराच्या डोळ्यात तरळते
घरट्यात चोची उघडून बसणार्या पिलांत लपते
आभाळी दिमाखात उभ्या इंद्र-धनुष्यात दिसते !
दिसते ती कधी दृष्य रुपात तर कधी अदृष्य
प्रेरणादायी विचारच पेलतात हे शिव-धनुष्य !
कवितेशिवाय असू कसं शकतं कवीचं भविष्य ?
काव्याविना-कवितेविना अपूर्ण अवघं आयुष्य !
शब्दब्रह्म-कृपेमुळे स्फूर्तीरुपी कारंजे उडत राहते,
म्हणूनच गद्यातून सुध्दा नव-कविता जन्म घेऊ शकते !
अंतरात्म्यात ती असते, निमीत्त मिळताच शब्दरुप घेते
अन् झुळूझुळू वाहणाऱ्या प्रवाहासारखी अलगद उमटते !
जीवन जगण्यास जसं आवश्यक हवा-पाणी-अन्न-निवारा,
स्वास्थ्यपूर्णतेसाठी जरुरी गायन वादनादी नानाविध कला !
तोड नाही कथा-कादंबरी-कविता आदी ललित वाङमयाला,
शत-शत नमन साहित्य-माध्यमातून त्या ईश्वरीय संकेताला !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply