कविता – 🌷 ‘ पिंगा‘ तारीख – शुक्रवार, २० सप्टेंबर २०१९


कविता – 🌷 ‘ पिंगा‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारीख – शुक्रवार, २० सप्टेंबर २०१९

माणसांत जेवढे गुण असतात …
तेवढे दोषही भरलेले असतात …
कळत-नकळतच चुका होतात …
नंतर त्यांची प्रश्नचिन्ह बनतात !

त्यावेळी टाकलेली दोन पावलं …
हळहळ बनून मग फेरा धरतात …
काय चूक होतं अन् काय बरोबर,
या संभ्रमातच, कैक वर्षं सरतात …

बुडत्याला जसा काडीचा आधार …
डोळे कारणांचा वेध घेत राहतात !
गुंता-गुंत मनातली किचकट फार …
अशानं स्वप्नं कशी होणार साकार ?

मुठीत पकडून एखादं फुलपाखरू,
तळवा आपसूक रंगीत होऊन जातो …
निष्पाप जीव मात्र कासावीस होऊन,
जगण्यासाठी शर्थीनं, धडपड करतो …

जे जे घडायचं होतं ते घडून गेल्यावर,
सारा आसमंत होई एकदम शांत शांत …
दर्याकिनारी लाटा करती अविरत दंगा …
मनांतरी मात्र विचारांचा सततचा पिंगा …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



























Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!