कविता – 🌷 ‘ पालवी ‘ तारीख – रविवार, २९ सप्टेंबर २०१९


कविता – 🌷 ‘ पालवी ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारीख – रविवार, २९ सप्टेंबर २०१९
वेळ – दुपारी – ४ वाजून २९ मि.

अजून एक नवा करकरीत दिवस येतो,
नव्या आशांची कोवळी पालवी लेऊन !

आशाळभूत होऊन,
मुजरा करतो लवून …
अपेक्षांचं ओझं लादून,
बदलांची जाणीव करुन …
पुसट विचार जातो चाटून …
अन् काटाच येतो सरसरून …

पाच गेले अन् पन्नास राहिले …
म्हणता-म्हणता आली पन्नाशी !
बदलत गेली सगळी परिस्थिती,
बदलांची पुन्हा जाणीव होऊन …

असं वारंवार का बरं घडतं ?
याच विचाराने मन पोखरतं …
अपेक्षा ठेवून निराश होऊन,
पदरी एक नवा अनुभव येतो …

तरुण सळसळतं रक्त-नवा जोश …
नवनवीन योजना-आनंदी जल्लोष
मग प्रश्नांची ही झुंड हवी कशाला ?
झुंज न देता विषयाला बगल देऊन …

नवं-नवं सगळं हवं-हवंसं वाटतं …
जुनं-पानं मग निरूपयोगी ठरतं !
अनुभवाचे बोल वाटतात फोल …
सोईस्कर रित्या ऐकून-न ऐकून …

अजून एक नवा करकरीत दिवस येतो,
नव्या आशांची कोवळी पालवी लेऊन !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!