कविता : 🌷’ परम-शक्ती ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले,
तारिख : रविवारी १३ ऑगस्ट २०२३
वेळ : दुपारी, २ वाजून २७ मि.
दोन-जीवांस जोडी, कोणती शक्ती ?
कोण लावी दोघा ओढ मिलनाची ?
कोण करी नवजीवाची-नवनिर्मिती ?
वात्सल्य-माया कोण निर्माण करी ?
कठोर हृदयाला पाझर कोण फोडी ?
दया-क्षमा-शांतीचे झरे कोण सोडी ?
भव-दु:खाची विस्मृती कोण घडवी ?
कोण देई परम सुखाची दिव्यानुभूती ?
कोण खेचते नद्यांना समुद्रांकडे ?
कोण निर्माण करी मोठ्ठे पर्वतकडे ?
कोण घाली भयंकर गारांचे सडे ?
कोण बळ देई म्हणून पाखरु उडे ?
रात्रीनंतर उजेडाकडे कोण न्हेई ?
वीतभर पोटात कोण भूक देई ?
रेताड जमिनीत कोण देई पाणी ?
कोण खारट करी सागराचं पाणी ?
कोण भडीमार करी संकटांचा ?
कोण जोश देई मात करण्याचा ?
कोण किरण दाखवी आशेचा ?
कोण अदृश्य हात, देई मदतीचा ?
कोण रक्षी अनाथ-बाल-जीवांना ?
कोण देई शिक्षा-दंड दुष्ट-अधमांना ?
कोण देई जिवंतपणी नरक-यातना ?
कोण पेटवी सूडाची अघोरी भावना ?
कोण घाली घास भुकेल्या मुखी ?
कोण पुसतो अश्रु, असता दु:खी ?
कोण करी भूकंप वा ज्वालामुखी ?
कोण देई दृष्टांत, लागता समाधी ?
पाप-पुण्याचा हिशोब कोण ठेवी ?
पापांची-फळं कोण भोगण्या लावी ?
कोण स्वप्नं रंगवी नंतर भंगही करी ?
कोण कणाकणातून स्थित चराचरी ?
कोण आहे, जळी-स्थळी-पाषाणी ?
नांवं-रुपं अगणित, कोण अंतर्ज्ञानी ?
कोण अंश-रुपात-स्थित अंतर्यामी ?
जो निराकार-निर्गुण-अनंत-अनादि !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply