कविता : 🌷’ नेमेचि येतो ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : रविवार, ३० जुलै २०२३
वेळ : सायंकाळी, ५ वाजून ५८ मि.
डोळ्यात प्राण आणून सृष्टी, जन-जीव
ज्याची चातकासारखी वाट बघतात,
तो पर्जन्य-ऋतु जरी एकच असला,
तरी त्याचे बरेच भाऊबंद असतात …
रिमझिम पाऊस :
निरागस बाळाच्या बाळ-लीला,
त्याचं हसणं-बागडणं-हुंकार देणं
म्हणजेच सुखाचा रिमझिम पाऊस
मुसळधार पाऊस :
५-६ किशोरवयीन मुलं/मुली जमली की
त्यांच्या खळखळून हसण्या-बोलण्यातून
कोसळत राहतो आनंदाच्या जल्लोषातून
तोच हा मुसळधार पाऊस
पावसाची रिपरिप :
बाहेर पडणारा पाऊस थोडा थांबला तरी,
बायको नाराज झाल्यावर तिच्या सततच्या
कुरबुरीतून होतच राहते
ती ही कंटाळवाणी रिपरिप
पावसाची झड :
मनातल्या मनात धुसफुसणा-या दोन शेजारणींमध्ये/जावांमध्ये,
बहिणी-बहिणींमध्ये शेवटी वादळी-वादाची “आमनेसामने”अशी
एकदाची फैर झडते …मग कुठे अंमळ शांतता नांदते !
हीच ती झोडपून जाणारी पावसाची झड
धावता पाऊस :
छत्री हरवून, चिंब भिजून, लपत-छपत नवरोजी घरात घुसत असता,
त्याला ‘ रंगेहाथ ‘ पकडून तत्क्षणी बायकोचा उत्स्फूर्त-विजयी
शाब्दिक भडीमार …म्हणजे जणू ‘धावता पाऊस’ !
गारांचा पाऊस :
एकदा का चूक उघडकीस आली की त्यानंतर त्या व्यक्तीवर,
घरातील सर्वांच्या रोखलेल्या नजरा आणि तिरकस टोमण्यांचा
वर्षाव म्हणजे जणू गारांचा पाऊस.
अतिवृष्टी :
हरवून गेलेलं इवलंसं वासरू सुदैवानं पुन्हा गोठ्यात
परतल्यावर गोमातेनं त्याला ओंजारुन-गोंजारुन,
त्यावर केलेला वात्सल्याचा-मायेचा अद्भुत वर्षाव …
म्हणजे जणू पावसाची अतिवृष्टी
गारांचा पाऊस :
सर्वकाही सुरळीत असताना फुटकळ कारणावरून काही बिनसलं,
की प्रथम (मुळूमुळू असा) हलका पाऊस पडतो पण
तरीही स्थितीत फारसा फरक पडला नाही की अति-शीत वादळ-वारे
व पाठोपाठ चक्क गारांचा (शाब्दिक) तडतडाट व्हायला सुरुवात होते
हाच तो घरोघरी होणारा गारांचा पाऊस …
हलका पाऊस : वर लिहिल्याप्रमाणे याला विशेष असं कारण लागत नाही,
हा अधूनमधून कधीही पडू शकतो … आजवर जगातील कोणत्याही
तज्ञ-हवामाना-खात्याला याचा अचूक अंदाज बांधता आलेला नाही !🤣
इंग्लंडच्या हवामानासारखा नित्य नियमाने तो भुरु-भुरु पडतो …
हिमवर्षाव :
मोठ्या खडाजंगी नंतर बोल-चाल बंद झाला की हिमवर्षाव हा झालाच म्हणून समजा.
हिमवादळ : वर लिहिल्याप्रमाणे हिमवर्षावाला सुरुवात झाल्यावर जर अपेक्षित पावलं
उचलली गेली नाहीत तर त्या पाठोपाठ येणाऱ्या या
हिमवादळापुढे कोणाचं काही चालत नाही …!
मोसमी पाऊस :
हा फक्त मनपसंत खरेदी न होणं, वार्षिक परदेशी सहल न होणं,
अनपेक्षित सासरकडच्या माणसांचं येणं इत्यादि कारणांनी होतो
कृत्रिम पाऊस :
मोठ्या मुश्किलीने जमवत आणलेली मनाजोगती स्थिती अचानकपणे
हाताबाहेर जाऊ लागली की हा हरहुकुमी-हमखास बारा-मास पडतो !
याला स्थळ-काळ-वेळ, वयाची अट अथवा मर्यादा लागू होत नाही …
अगदी लहान बाळांपासून, शाळकरी मुलं-मुली, युवक-युवती,
थेट आजी-पणजींपर्यंत सगळी मंडळी सर्रास हा पाडताना दिसतात …!
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply