कविता : 🌷’ निर्मळ झरा ‘


कविता : 🌷' निर्मळ झरा '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

आमचा सगळ्यात-मोठा-भाऊ म्हणजे प्रिय माधव-दादा
बाकी सर्व भाऊ-अण्णा, फक्त त्यालाच म्हणायचो दादा

गोरा-मध्यम-शरिरयष्टी-तीक्ष्ण-दृष्टी-उपजत मिश्किलपणा
पी.जी.वूडहाऊसचा तिरकस विनोद, नसानसात भिनलेला

धारदार नाक, मध्यम-उंची, विरळ केस, सडेतोड स्वभाव
थोडक्यात तो समाधान मानायचा, अधिकाची नव्हती हाव

त्याचं मोठंसं मित्र मंडळ, दांडगा व्यासंग-लेखन-वाचनाचा
शनिवार-रविवार मात्र ब्रीज खेळण्यासाठी राखून ठेवायचा

संपूर्ण घरासाठी कायमचा भक्कम आधार म्हणजेच दादा
आईच्या बरोबरीने तो पण सर्व भावंडांसाठी, सदैव झटला

शिक्षण असो, अभ्यास असो, खेळ असो, दादा लागायचा
तो सुद्धा जीव ओवाळून टाकायला, सदा तयार असायचा

अगदी लहानपणी आम्ही मिरजेला व दादा मुंबईला होता
फक्त जोडून सुट्टी मिळाल्यावरच मिरजेला येऊ शकायचा

मी आणि लामू त्याची चातकासारखी वाट बघत बसायचो
तो खेळणी-खाऊ घेऊन आल्यावर, एकदम खुश व्हायचो

दादा मुंबईला काटकसरीने राहून, जास्त पैसे पाठवायचा
त्यामुळे सर्वच भावंडांचे शिक्षण, अभ्यास-सुरळीत व्हायचा

असामान्य बुद्धिमत्ता,पण इंजिनिअरींग प्रवेश न घेता आला
सर्वांच्याच अभ्यासावर-प्रगतीवर तो बारकाईने लक्ष द्यायचा

वाचनाची प्रचंड आवड म्हणून ५-६ वाचनालयाची मेंबरशिप
लिखाणाची-शैली उत्तम म्हणून लेख-कविता-कथा प्रकाशित

इंग्रजी-मराठी-संस्कृतादि भाषांचा अभ्यास व लिखाण केले
दोन-दोन नोक-या करुन कुटुंबासाठी अतोनात कष्ट सोसले

त्याचे इंग्रजी-मराठी-वर्तमानपत्रे-अमृत-नवनीत-रीडर्स डायजेस्ट
यामधून तसेच सुप्रसिद्ध नामांकित संस्थेतून-प्रकाशित-साहित्य

नवनवीन कल्पना, आधुनिक तंत्रज्ञान, संगणकीय तांत्रिक ज्ञान
वाढत्या वयातही आत्मसात करण्यासाठी एका पायावर तय्यार

लहानांना लाजवेल असा प्रचंड उत्साह-व-ऊर्जेचा कायम साठा
काही झालं तरी-मोडेन पण वाकणार नाही-असा-काहीसा-ताठा

आर्थिक अडचणीमुळे स्वतः इंजिनिअर झाला नाही पण त्याने
दोन इंजिनिअर, दोन डॉक्टर घडविले, शिक्षणास-प्राधान्य दिले

घरगुती सात्विक आहार वेळेवर ग्रहण-करुन-कामाला-जात-असे
त्याच्या दूरदृष्टीमुळे शैलाताई-अशोकअण्णा डॉक्टर होऊ शकले

सुअण्णा-किअण्णा इंजिनिअर झाले-आम्हास स्वावलंबी बनविले
स्वतःच्या मुलांएवढंच उदंड प्रेम-त्याने-सर्व-भावंडांवर-कायम-केले

योजना आखून योग्य वेळी अचूक-निर्णय-घेण्याची-विशेष-क्षमता
त्या तुलनेत त्याच्या गुणांच्या फक्त-एक-शतांश-माझी-गुणवत्ता

इतरांना तो शिघ्रकोपी वाटला तरी मला-आनंदी-विनोदीच-वाटला
सत्तरीतही सायकलवर स्वार-होऊन, वाचनालयं पालथी घालायचा

सुचलेल्या नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यात प्रचंड रमायचा
त्या काळात-तो फक्त त्या-ठराविक-गोष्टींनीच-झपाटलेला-असायचा

चिन्मया-मिशनच्या-माध्यमातून अध्यात्मिक-व-सामाजिक कार्य केले
गरजवंतास-धावून-मदत-करूनही, त्याची-वाच्चता-कधीच-करीत-नसे

उभं आयुष्य सर्वांना देत होता-कुणाकडून, कधी-काही-घेतले-नाही
आई-दादा-सर्व कुटुंबीय यांवीण, आयुष्याची-कल्पनाही-संभव-नाही

कधी फणसासम खरखरीत वाटला तरी आतून निर्मळ झरा होता
हे लिहीताना संतत डोळ्यांमधून झुळुझुळू झरतोय, जाणवत होता

नितांत आदरभाव-अनंत प्रेम-अखंड मायाच भरभरून वाहू लागते
नुसत्या त्याच्या आठवणीने अंत:करण कृतज्ञतेने जड होऊन जाते

पुन्हा असा दादा होणे नाही, त्याच्यासाठी-कातडीचे-जोडे-जरी-केले
"प्रत्येक-जन्मी तो-दादा-म्हणून-मिळू दे" हेच-मनोमन-साकडे-घातले

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


2 responses to “कविता : 🌷’ निर्मळ झरा ‘”
  1. Manisha Avatar
    Manisha

    खुप सुंदर

    1. Tilottama Lele Avatar
      Tilottama Lele

      Thank you dear!

error: Content is protected !!