कविता – 🌷 ‘ निद्रिस्त ‘ तारिख – २ नोव्हेंबर २०१९


कविता – 🌷 ‘ निद्रिस्त ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २ नोव्हेंबर २०१९
वेळ – संध्याकाळी ७ वाजून ५९ मि 

कोणा सांगू ही अंतरीची कळ
ही मुकीच, पश्चात्तापाची झळ
साचलेली मनातील जळ-जळ
पिच्छा पुरविते सदाची हळहळ 

शिणलेल्या या तना-मनाला
अव्यक्त वेदना ती अपरंपार
काय करावे काहीच सुचेना
टाकला दैवावरी सारा भार …

ऐन तारुण्याची ती सळसळ
अन् का निराशेचा भस्मासुर
गिळण्या टपला टाकूनी गळ …
दृश्य किती ते भयावह-भेसूर …

कळस बनवायचा घाट घातला,
बावनकशी सोनं, बेगडी मुलामा
बिन फायद्याचा फुकटचा ड्रामा
नामधारी विकतचे काकामामा …

सगळंच होतं आखीव-रेखीव …
जणू होई साकार स्वप्न सजीव 
अतृप्तीनं भूतकाळ पोखरून,
जणू घडीच टाकली विस्कटून …

आपलं नाणं जरी खणखणीत …
परिस्थितीमुळे झालं गुळमुळीत
मग मांजरीच्या गळ्यात ती घंटा,
बांधूनही कोणाला फायदा-तोटा …

मांजरीचा झालाय बेरकी बोका …
वेळीच त्याला आवरायला हवा
संधी मिळताच घालेल तो घाला,
अन् वेड पांघरून करेल कांगावा

सोन्याला भट्टीत तावून सुलाखून
त्याचा कस, निखरणारच अजून …
अस्सल पुढे बेगडी कसं टिकणार ?
निद्रिस्त डोळे कधी बरं उघडणार ?

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆















Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!