कविता -🌷 ” नातं म्हणजे एक कोमल तंतू “. दिनांक – २७ ऑगस्ट २०१६

कविता -🌷 ” नातं म्हणजे एक कोमल तंतू “

कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
 दिनांक – २७ ऑगस्ट २०१६
 
नातं म्हणजे एक कोमल तंतू …
रेशीम-किड्या मधून नुकताच निघू लागलेला,
भाव-बंधनानी ओलाचिंब झालेला …
आणि तरीही काहीसा निराळा …

आई आणि तिचे बाळ यांचा कधीही न संपणारा एक जिव्हाळ्याचा जीवन-प्रवास …
तान्हुल्यानं घट्ट पकडून ठेवलेल्या इवल्याश्या मुठीत …
अन् आईच्या उबदार कुशीत …

भावा-बहिणीचा एक अवर्णनिय असा,
लडिवाळ जीवन-प्रवाह……
राखी-भाऊबीजेच्या औक्षणाने संतत तेवणाऱ्या 
नंदादीपा सारखा, शान्त, अखंड व अक्षय…..

दोन भावा-भावा मधला एक हवाहवासा वाटणारा … 
लुटुपुटूच्या भांडणानी अजुनच अधिक भक्कम होत जाणारा,
विलक्षण अवर्णनीय बंधू -भाव …

पति आणि पत्नीची जन्मोजन्मीची एक अतूट जोडी …
आणि त्या गूढ-बंधनातली अवीट, अगम्य अशी गोडी …

वडील आणि मुलं यांच्यातील हळुवार बंध …
एक बिंब तर दुसरे त्याचेच हुबेहूब प्रतिबिंब …
जणू लाड व शिस्त यांची अचूक अशी सांगड …

वडील आणि लेक यांच्यातील लडिवाळ बंध …
दूधा-वरच्या त्या साईचे केव्हढे कोड-कौतुक …
इथं शिस्त-बिस्त नाही हं, लाडच होतात फक्त !

नातं जुन्या-नव्या पिढयांमधलं, काहीसं अतूट …
कधी आंबट, कधी तिखट तर कधी कडू-गोड…
कधी काळजी घेणारं,तर कधी काळजी करणारं…

सर्वच कोमल तंतू- या रेशमी तंतूनी विणलेले आयुष्य नामक महावस्त्र,
प्रत्येक जीवन आणि असे विविध जीव एकत्र येऊन बनते, एकेक कुटुंब …
हात अदृश्य असतात, यांना गुंफुन ठेवणारे-ती “करामत”करणारी शक्ति अदृश्य असते …
प्रकट होत असतात ते, त्यातून निर्माण झालेले कोमल भाव-तरंग …
विविध रूपांनी, विविध अंगांनी, नानाविध सूक्ष्म कणा-कणांनी …

सूर्याच्या प्रत्येक किरणा-किरणातून …पावसाच्या प्रत्येक थेंबा-थेंबातून …
फुला-फुलावरच्या लकाकणाऱ्या दव-बिंदुतून …पाखरांच्या कर्ण-मधुर किलकीलाटातुन …
पक्ष्यांच्या उंच-उंच उडणाऱ्या थव्यामधून …पाना-पानांच्या सळसळीतुन …
पाण्यावरच्या तरल लहरींतून …अवघ्या निसर्गाच्या प्रेमळ हाकेतून,
निर्माण होतात ते नात्यांचे कोमल, हळुवार तंतू …

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🌅




















Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!