कविता – 🌷 ” नातं म्हणजे एक कोमल तंतू “

कविता - 🌷 " नातं म्हणजे एक कोमल तंतू "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
दिनांक - २७ ऑगस्ट २०१६

नातं म्हणजे एक कोमल तंतू
रेशीम-किड्या मधून नुकताच निघू लागलेला,
भाव-बंधनानी ओलाचिंब झालेला....
आणि तरीही काहीसा निराळा....

आई आणि तिचे बाळ यांचा कधीही न संपणारा एक जिव्हाळ्याचा जीवन-प्रवास...
तान्हुल्यानं घट्ट पकडून ठेवलेल्या इवल्याश्या मुठीत व आईच्या उबदारशा कुशीत...

भावा-बहिणीचा एक अवर्णनिय असा
लडिवाळ जीवन-प्रवाह......
राखी-भाऊबीजेच्या औक्षणाने संतत तेवणाऱ्या
नंदादीपा सारखा
शान्त, अखंड व अक्षय.....

दोन भावा-भावा मधला एक हवाहवासा वाटणारा.....
लुटुपुटूच्या भांडणानी अजुनच अधिक
भक्कम होत जाणारा,
विलक्षण बंधू -भाव.......

पति आणि पत्नीची जन्मोजन्मीची एक अतूट जोडी..
आणि त्या गूढ-बंधनातली अवीट अशी गोडी....

वडील आणि मुलं यांच्यातील हळुवार बंध......
एक बिंब तर दुसरे हुबेहूब प्रतिबिंब........
जणू लाड व शिस्त यांची अचूक सांगड....

वडील आणि लेक यांच्यातील लडिवाळ बंध.....
दूधावरच्या साईचे केव्हढे ते लाड-कोड-कौतुक.....
इथं शिस्त-बिस्त काही नाही, लाडच होतात अनेक!

नातं जुन्या - नव्या पिढयांमधलं,
कधी आंबट, कधी तिखट तर कधी गोड.....
कधी काळजी घेणारं,
तर कधी काळजी करणारं....

सर्वच कोमल तंतू.......
या रेश्मी तंतूनी विणलेले महावस्त्र म्हणजे प्रत्येक जीवन
आणि असे विविध जीव एकत्र येऊन बनते एकेक कुटुंब......
या सर्वाना गुंफुन ठेवणारे हात अदृश्य असतात.....
ती करामत करणारी शक्ति अदृश्य असते......

प्रकट होत असतात ते,
त्यातून निर्माण झालेले कोमल भाव-तरंग
विविध रूपांनी, विविध अंगांनी.....

सूर्याच्या प्रत्येक किरणा-किरणातून.....
पावसाच्या प्रत्येक थेंबा-थेंबातून.....
फुला-फुलावरच्या लकाकणाऱ्या दव-बिंदुतून......
पाखरांच्या कर्ण-मधुर किलकीलाटातुन......
पक्ष्यांच्या उंच-उंच उडणाऱ्या थव्यामधून ......
पानांच्या सळसळीतुन .......
पाण्यावरच्या तरल लहरीतून....
अवघ्या निसर्गाच्या प्रेमळ हाकेतून,

निर्माण होतात ते नात्यांचे कोमल, हळुवार तंतू ......

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!