कविता – 🌷 ” देव-तत्व “

कविता - 🌷 " देव-तत्व "

कविता - 🌷 " देव-तत्व "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

देव किंवा देव-तत्व, मान्य-अथवा-अमान्य जरी केले
तरी जगात जळी-स्थळी-पाषाणी देवत्व पूरेपूर आहे
ज्यांच्या मनी श्रद्धा-भक्ति-अध्यात्माचा निवास आहे,
प्रत्येक सजीव-प्राणी-मात्रात, देव-सर्वत्र, स्थित-आहे   || १ ||

आपल्या मानण्या-न-मानण्याने काहीच बदलत नाही
जो निरामय, निराकार, निर्गुण अजर-अमर-अविनाशी
त्यांसी-काय-उणे-असणार-आहे या विशाल-विश्वामाजी
दोन-हस्त-एक-मस्तक त्यास-प्रसन्न-करण्या पुरेसे-आहे  || २ ||

त्याच्या मर्जीविना, जगभरात एक-पानही हलत नाही
त्याच्या स्मितहास्ये कळी-कळीचे रुपांतर फुलात होते
त्याच्या सुगंधित श्वासाने ऋतुचक्र तालबद्धतेने फिरते
त्याच्या नुसत्या कटाक्षाने, सृष्टी बहरते, फळते-फुलते  || ३ ||

देव, सजीवांच्या मनात-देहात-आत्म-गाभा-यात वसतो
वा-यासंगे शेतातील पिकांबरोबर मनसोक्तपणे डोलतो
बाळ-गोपाळांच्या निरागस हास्यातून झळकत असतो
निसर्ग-देवतेच्या कणा-कणामध्ये सामावलेला असतो    || ४ ||

अंत:चक्षूंनी जगाकडे पाहीलं की, सगळीकडे दिसतो
प्रत्येक सत्कर्मातून, सत्कृत्यांमधून तोच साकार होतो
मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षणी तो साथ करतो
प्रत्येकाच्या जीवन-रथाचे सारथ्य तो तत्परतेने करतो   || ५ ||

जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत तो श्वास बनून साथ देतो
सुख-दु:खाच्या दर प्रसंगी तो स्पंदनातून व्यक्त होतो
संकटकाळी, मन-बुध्दी-शरीर यांचा-समतोल तो साधतो
मानवाला "देवत्वा"चा भक्तिपूर्ण मार्ग तोच दाखवतो   || ६ ||

जोपर्यंत आकाशी सूर्य-चंद्र-धृवतारा-चांदण्या आहेत,
पृथ्वीवर माणसं-प्राणी-निसर्ग-जीवन जीवीत आहेत,
"देव आणि देवत्व"या शाश्वत-संकल्पनेला-मरण-नाही
आपल्या मानण्या-न-मानण्याने काहीच बदलत नाही    || ७ ||

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!