कविता – 🌷 ” दूधावरची-साय “


कविता - 🌷 " दूधावरची-साय "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

आजी आणि नातवंडांचं,
एक वेगळंच विश्वं असतं...
गोड गोड मधाळ जसं ते,
मध-माशांचं पोळं असतं...

साखरेच्या पाकाहूनही,
गोड पापा सुखदायी...
इवल्या हातांच्या मिठीत,
सामावली दुनिया सारी...

नातवंडांच्या सहवासात,
वयाला काही मर्यादा नाही...
भाबड्या बोबड्या बोलीत,
पुरती विरघळते आज्जी...

टप्पो-या मिश्किल डोळ्यात,
उत्कंठा असते काठोकाठ...
सर्वच असतं नवीन-नवीन,
प्रश्नामागून, प्रश्न पडतात...

लडिवाळ वागणं-बोलणं...
मनसोक्त खेळणं बागडणं,
फावल्या वेळामध्ये मग...
प्रश्न विचारून भंडावणं...

नातवंडं असतं लहानसंच
आजीचं वय भातुकलीचं...
आजीला नातवंडं म्हणजे,
"दूधावरची-साय" वाटतं...

निष्पाप, निरागस हसणं...
घरभर दुडू-दुडू धावणं...
चिऊ-काऊच्या गोष्टींत,
जणू आयुष्यच रमून जातं...

लाड करुन घेण्यासाठी,
आजीलाच लाडी-गोडी...
अर्जुन-आजीची जोडी,
म्हणजे घट्ट, कवडी-दही...

एक दिवस भेट नाही,
तर चैनच पडत नाही...
दिवसभर खेळूनही,
मन काही भरत नाही...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!