कविता - 🌷 ‘ दुष्टांसाठी, आम्ही धुरंधर ! ‘
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
पंख छाटले नियतीने जरी,
आक्रसले ना माझे अंबर ...
कंबर कसूनी झेप फिरुनी,
नाही कसलेच, अवडंबर !
अगणित घाव पचवूनही,
हसत-मुखे, सामोरे होऊ ...
आकाश-पाताळ एक करुनी,
शर्थीने लढू, आम्ही शिकंदर !
अनंत यातना सहूनही,
ताठ कण्याने, जगून दाखवू ...
आले बहु, येतील बहु परि,
पुरून उरू, आम्ही बिलंदर !
होत्याचे नव्हते झाल्यावरही,
राखेमधूनी, विश्व उभारू ...
कधी न डगमगू, कधी न बिथरू ...
आम्ही सारे, मस्त-कलंदर !
तुफानी लाटा लीलया झेलत,
विराट रूपाचं दर्शन घेऊ ...
कालिया-मर्दन सहज करुनी,
दुष्टांसाठी, आम्ही धुरंधर !
🌷@तिलोत्तमा विजय लेले🙏🕉️🔆
Leave a Reply