कविता :🌷’ दिव्य-झंकार ‘

कविता :🌷’ दिव्य-झंकार ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, ३ ऑगस्ट २०२३
वेळ : संध्याकाळी, ८ वाजून २३ मि.

मंदिरात गेल्यावर घंटा वाजवली की छान-प्रसन्न वाटतं,
बालपणी देवळात जाण्यास तेच मोठं आमिष असायचं !

टाचा उंचावून प्रयत्नांनी घंटा वाजवण्याचं अप्रूप वाटायचं,
ती विलक्षण रोमांचक गंमत संपूच नये असं वाटंत राहायचं

मंदिरी जाऊन घंटानाद केलाच नाही तर मग कसली मजा ?
भोजनाला जाऊन न जेवताच येण्यासारखी आहे ही सजा !

महान् विभूतींच्या अस्तित्वानेच वास्तु पावन-पवित्र होतात,
अशा वास्तुत चैतन्यदायी शुभ-शक्ती सदैव संचार करतात !

साधु-संत-महंतादि विद्वान-दिव्य-व्यक्तींच्या पायधूळीमुळे,
वास्तु-परिसराचा कण-न्-कण भारित होतो विशेष उर्जेने !

लहान-थोर सर्वांना ही सकारात्मक उर्जा चुंबकासम खेचते,
या पवित्र-स्थळी जाण्याची मनस्वी ओढ म्हणूनच तर लागते 

एकदा सुप्रसिद्ध प्राचिन मंदिरास भेट देण्याचा योग आलेला,
तिथली मोठ्ठी पितळी घंटा वाजविण्यास जीव-आतुर झालेला !

ती वाजविता सप्त-स्वरांच्या-ध्वनीने भरे भव्य-मंदिर-गाभारा,
प्रणव-स्वराच्या-प्रतिध्वनींनी पूर्णतया तुडुंब-तृप्त-मन-गाभारा !

ती अत्यंत-दुर्मिळ-अनुभूती सर्वांगी फुलला होता अद्भुत-शहारा
संगीतश्रुतींसह कानांना कोमल स्पर्श करणारा मंद-शितल-वारा !

तो दिव्य-झंकार हरेक भक्ताच्या मन-मंदिरी सदैव निनादत राहतो
अन् बिकट स्थितीतही सद्सद्विवेक-बुध्दीला कायम जागृत ठेवतो !
संकटसमयी सन्मार्गावर भक्कमपणे टिकून राहण्याची प्रेरणा देतो !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆





























































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!