कविता – 🌷 ” थरारक नाट्य ”
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शुक्रवार, २१ जूलै २०१७
कालच्या मधाळ अनुभवानंतर, पाय आपोआप वळले, थेट देनाली नँशनल पार्क कडे
रस्ते होते नाग-मोडी, वेडे-वाकडे-जणू देनाली स्वतः खेचत होता त्याच्याकडे …
आदल्या दिवशीच्या, “टफ-ट्रेलवर”- बेहद्द खुश होते अमित-राहूल दोघेही
आजच्या सुंदर सोनेरी सकाळी -तिघंही निघाले फिरत वाट निराळी …
काल घाटातून, गाठलं होतं सर्वोच्च टोक-आजचा मनसुबा गाठायचं तळाचं टोक…
ट्रेल बघायला साधी-सोप्पी-भुरळ घालणारी वाटत होती, मस्त मजेत चालली होती मंडळी …
एकीकडचा रस्ताच होता बंद केलेला-एक सूचनावजा बोर्ड, होता लिहीलेला
“अस्वलांचं वास्तव्य असण्याचा धोका”-जणूकाही, अस्वलांसाठी लिहीला होता !
का कोण जाणे, थोडंसं अंतर कापल्यावर-अचानक तिला आंतरिक संकेत जाणवला,
पाऊल पुढे टाकण्यास मन राजी होईना-दोन्ही मुलांना सांगून, त्यांना काही ते पटेना …
शेवटी अस्वलांची शक्यता बोलून दाखवली-तरीही त्यांनी काढता पाय घेतला नाही…
केवळ त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून पुढे निघालो, खूप खाली उतरून गेलो आम्ही…
पोट-तिडकीनं परत फिरूया असं-निक्षून बजावलं, पण ढिम्मं, दोघेही ऐकेनात !
ऐन तारुण्य, त्यांचं सळसळणारं रक्त-नवनवीन आव्हानं पेलण्यास आसुसलेलं मन …
अखेरीस ती स्वत:च-चढण चढायला उलट्या पाऊली, मागे वळली…
वाटलं आईच्या काळजीनं का होईना-दोघे मागोमाग येतील, तिची पर्स द्यायला तरी …
ट्रेलमध्ये तिला वजन उचलायला नको, म्हणून राहूलनेच घेतली होती पर्स मागून …
मनात ओंकाराचा उच्चार करंत-करतंच, संपूर्ण घाट कशी चढली ते तिलाही नाही समजलं
खाली वाकून बघते तर दोघेही पार ठिपके, अगदी तळापर्यंत जाऊन पोहोचले असावेत
जेमतेम वर येऊन श्वास घेते-न-घेते तोच सर्वांना धोक्याची सूचना देणारी घोषणा झालीच !
सिक्योरिटीला मुलांची माहिती देऊन-त्यांना सुरक्षित वर आणण्याची-कळकळीची विनंती तिनं केली…
पण मनाला स्वस्थता नव्हती-पुढाकार घेऊन, सतत पाठपुरावा करुनही तिला बेचैनी वाटतच होती…
विनंतीला मान देऊन शेवटी तिला-उंचावरून टेहळणी करुन मुलांना हेरण्याची सवलत मिळाली !
पहाते तर एक माजलेली आई-अस्वल व तिची दोन छोटी बछडी-हिरव्या गवतात हलत-डुलत रमलेली…
तिच्या छातीत धस्सं झालं, तिचीही बछडी बाहेर असुरक्षित, त्यांना या धोक्याचा थांग-पत्ताही नव्हता…
सिक्योरिटीचा पिच्छा पुरवून अखेरीस-एका गार्डला खास वॉकी-टॉकी देऊन खाली होता पाठवला…
तिचा अवघा जीव, खाली मुलांजवळ होता-त्या विधात्यानंच केला असावा त्यांचा सांभाळ…
दूरुनच पाहून,अस्वल व तिची पिल्लं, दोघांनी प्रसंगावधान दाखवून, धूम ठोकली विरूद्ध दिशेनं…
प्रत्येक मातेला तिच्या पिल्लांना जपायचं असतं, त्यांच्या जीवाला धोका जाणवताच, चवताळून हल्ला करते-
सुदैवानं अस्वल-आईला वास लागण्याआधीच, तिची पिल्लं सुखरुप आली, दुसऱ्या बाजूनं चढंण चढून…
आईला पहाताच, धापा टाकत आलेली दोन्हीही
तिची पिल्लं अगदी लहान होऊन, तिला बिलगली,
तिच्या आनंदाश्रुंना आता मोकळीच वाट मिळाली …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply