कविता : 🌷 ” तृप्त-मस्त-मौला “


कविता : 🌷 " तृप्त-मस्त-मौला "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

जमखंडीच्या जवळच एक कुल्हळी नामक जे गाव आहे,
आपटे-घराणे-पूर्वजांना-ते-शौर्यासाठी इनाम मिळाले होते

गावात खास मातब्बर कुटुंबांत आपटे घराण्याची प्रतिष्ठा
मोठा चौसोपी चिरेबंदी वाडा व स्थावर-जंगम-मालमत्ता

आपटे कुटुंब श्रीमंत, गावातील शेत-जमिनी मालकीच्या
माझ्या वडिलांना चार भाऊ आणि तीन बहिणीही होत्या

एकत्र-कुटुंबपद्धती-मोठ्या काकांची मुलं"काका"म्हणंत,
त्यामुळे वडीलांना आम्ही सगळे पण 'काका' म्हणायचो

त्यांचा नितळ गौर वर्ण-मध्यम-बांधा-उंची, उत्तम प्रकृती
स्थितीप्रिय,भोळा स्वभाव,पण सावकारी अंगात मुरलेली

काकांच्या नोकरी-निमित्ताने आम्ही मिरजेत राहू लागलो
मोठ्ठं घर, माडी, समोर बाग, पाठीमागे-अंगण-मजेत-होतो

आमची आई शिस्तप्रिय पण आमचे काका नुसते प्रेमळ
आईकडे डाळ शिजली नाही की काकांना घालायचो गळ

सगळे लाड-ते-पुरवायचे पण आईच्या-शब्दाचा-मान ठेवूनच
त्यांचं स्वतःचं असं एक विश्व होतं, त्यातच ते रमत असत

मुंबईत येऊन आई-काका दोघांनी सगळं सांभाळून घेतलं
लहान-जागा-अडचणींचा-उच्चार न करता, समजून घेतलं

पहाटे उठून दूध-वाण-सामान आणायचे, लोणी काढायचे
फावल्या वेळात ट्रांझिस्टर कानाला लावून ऐकत बसायचे

कुणाच्या अध्यात-मध्यात नसून त्यांच्याच नादात असायचे
मोजके त्यांचे मित्र होते-सोसायटीत-ते-सर्वांचे-आजोबा होते

आहे या परिस्थितीत बदल झालेला त्यांना रुचायचा नाही
नाटक-सिनेमा, सहल-प्रवास-फिरणे-त्यांना-आवडायचे-नाही

आमची आई जितकी रसिक, तितकेच काका तटस्थ होते
देव-धर्म, कर्मकांड-अंधश्रद्धा-अंधविश्वास, नाही मानायचे

आम्हाला कधीच रागावले नाहीत वा कधी मारलंही नाही
मोडी लिपीत लिहू शकायचे, कानडी भाषा अवगत होती

जगात काय चालले आहे याचं सोयरसुतक त्यांस नसायचे
स्वभावतः मस्त-मौला होते, आहे त्यातच आनंदी असायचे

आम्हां-सर्वांतच-आईची-इच्छाशक्ती व काकांची-तृप्ती आहे
म्हणूनच जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक वृत्तीही आहे

पुरणपोळी खाताना-"प्रत्येक घासाला तोंड उघडते आहे" हे,
आमच्या काकांचे अत्यंत सुप्रसिध्द वाक्य नेहमीच आठवते

भगवद्गीतेत वर्णिलेल्या तटस्थपणाचे, ते-मूर्तीमंत-द्योतक-होते
आज ते नसले तरीही त्यांच्या सुखद स्मृतींनी, मन चिंब होते

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!