कविता – 🌷 ” ती ओढ अनामिक ” तारिख -१० सप्टेंबर २०१६

कविता – 🌷 ” ती ओढ अनामिक ” 

कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख -१० सप्टेंबर २०१६

कधी सुरेल सुरावट पडावी कानी …
आभाळ भासे जणू आरस्पानी …
हे स्वप्न पाहते की मी जागेपणी …
आशिष देतसे जणू निसर्ग-राणी …

सृष्टीदेवीची नव-विध रूपं …
निरखून त्या जगणं होई सोपं …
मोहविते ती आस्मानी निळाई …
निरपेक्ष प्रेम करणारी ती आई …

जणू क्षण-न्-क्षण मंतरलेला …
वावच नसतो मग चिंतेला …
मखमली स्वरावली कानाला …
जणू स्वर्गीय सुगन्ध सुमनाला …

श्रावण खेळ ऊन-पावसाचा …
मारवा वाटतोय हवाहवासा …
कैऱ्या, चिंचा, बोरांचा फडशा …
बालपणीचा गवसला कवडसा …

झिरमिर बरसती श्रावणधारा …
मनी मोर करीतसे गोड-इशारा …
उधळीत सप्तरंग उभवी पिसारा …
नकळत येतसे मधुर-शहारा …

टिपूर मस्त चांदणं पडलंय …
पोर्णिमेचा चंद्र लुभावतोय …
मन-मानस मुक्त विहरतोय …
आनंद दुथडी भरुन वाहतोय …

ह्रदयी लागला हा एकच छंद …
मन-भ्रमर तो रस-पानी गुंग …
स्वानंदे गुंजारव होऊनी धुंद …
उंच उंच गगनात उडे स्वछंद …

न कळे, का मज लागे ती ओढ अनामिक …
न कळे का खेचे हे वेडं मन, अधिकाधिक …
वाटे मज ही अनुभूती एकदम खासे-खास,
एकमेव-द्वितीय मोहक”अद्भुतसा आभास” ….

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅














Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!