कविता - 🌷 " ताई-जणू प्रति-आई "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १२ ऑक्टोबर २०१६
जन्मल्या-जन्मल्या डोळे किलकिले
समोर खूपसारे उत्सुक डोळे दिसले ...
एकटक जणू मला पाहत होते सगळे
त्यांच्या पल्याड मात्र काही-न-दिसले ...
थकून ग्लानीमधे मी डोळे मिटले
हे जग नेहमी पेक्षा होतेच वेगळे ...
पण निराळे असूनही मस्त वाटले ...
भूक लागताच"अमृत-प्राशन"केले ...
तो आनंद मात्र होता अनोखा ...
पारावार नव्हता, माझ्या सुखा ...
आईच्या उबदार कुशी-सारखा ...
तिच्या मखमली स्पर्शा-सारखा ...
आई हीच होती माझी संपूर्ण दुनिया
अगदी तिच्या सारखी, ताईची माया ...
दोघींच्या मायेने माझी सुखावे काया
"ट्याहं"करताच ताईला यायची दया ...
दर महीन्याचा माझा वाढदिवस
आई अन् ताईचा मग लागे कस
त्यांची पद्धत होती अत्यंत राजस
त्यामुळे लाड व्हायचे रात्रं-दिवस ...
झोपताना अंगाई कानी पडायची ...
ती ऐकताना छान झोप लागायची
कधी माझ्या आधी ताईच पेंगायची,
तिच्या मांडीवर गाढ झोपी जायची ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले🙏🕉️🌅
Leave a Reply