कविता : 🌷 ” झुलवा “


कविता : 🌷 " झुलवा "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

कधी नशिब सत्व-परीक्षा घेत असं झुलवत राहतं,
जणू काही लांब-लांबूनच वाकुल्या दाखवतं राहतं

मोठ्या मुश्किलीने जमवून आणूनही सगळं काही,
क्षणार्धात पत्त्यांच्या बंगल्यासारखं भुईसपाट होई

एखाद्या फुंकरीसरशी, साफ कोसळून खाली येतं
बघता बघता डोळ्यांदेखत, पार जमिनदोस्त होतं

वास्तविक आपण हवेत, नुस्ते इमले रचले नसूनही
सागरी लाटेच्या ओझरत्या स्पर्शाने छिन्न-भिन्न होई

हा 'झुलवा' जगा-वेगळा जीवघेणा खेळ खेळणारा
जणू गुदगुल्या करून हसवून-फसवून जीव घेणारा

हा प्राक्तनाचा भाग म्हणावा की आहे विधी-लिखित
की जन्मो-जन्मीच्या पाप-राशींची ही फळं अगणित

जोपर्यंत ही गुत्थी सुटत नाही, चैन पडणं सोपं नाही
अंतरीच्या गाभा-यातील ओंकाराला, स्वस्थता नाही

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!