तारिख – शुक्रवार २९ सप्टेंबर २०१७
कवितेचं नाव -🌷 ” जीवन-रहस्य “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
मधुर निनादंत श्याम-बासरी,
झंकारतच जणू सृष्टी हासरी
दूर-दूरवरुन हळुवार फुंकर
राधेचा अलगद उडवी पदर
साद घालता, पशु-पक्षी-हरिणी,
दुडूदुडू धावत पोहोचले तत्क्षणी
अनामिक असे हे मधाळ हितगुज
नकळत मज,ओढ लावी अलगुज
शब्दांपलिकडले हे अथांग क्षितिज
मनास मोहवते मज, खुणावते तुज
खुणावते, मोहक मनी रुजता बीज
उन्मनी अगणित उठतात, जल-लहरी
असंख्य श्रुति,कर्ण-मधुर ध्वनि-लहरी
शांत-निश्चल पर्वतमाला,घनदाट वनराई
मंद-मंद, शितल पवन, जोजवी अंगाई
निजला कान्हा, सुशांत राधा अन् गोपी
थिजला वारा, अवघं गोकुळ गेलं झोपी
हलके आली दबक्या पावली, उषा-सुंदरी
सोन-सकाळी,रवी-किरणेही झाली नाचरी
हर्षाने धरती खुलली,सोनेरी किरणात न्हाली
राधा लाजरी, कृष्ण-मय-जगी, विलीन झाली
कणा-कणात कृष्ण, श्रुति-श्रुतित कृष्ण
तना-मनात झंकार राधे-कृष्ण,राधे-कृष्ण
धारा-धारा-धारा-धारा बनत गेली राधा
जीवन-धारेमध्ये धारा मिसळत जाता,
बनला कृष्ण-महासागर, बघता-बघता
जीवनाचे-सत्य, कथिले जेंव्हा पार्था,
भगवत्-गीतेची निर्मिती,झाली सर्वथा!
जीवनाचं रहस्य सुंदर, साधं अन् सरळ
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply