कविता :🌷’ जाणीव ‘


कविता :🌷' जाणीव '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

श्रावणाची सुरुवात होताच अनेक सण उत्सवांची रेलचेल असते
पावसाळ्याचे दिवस, हिरवं-हिरवंगार सृष्टी-सौदर्य, खुलून दिसते

सरत्या श्रावणात येई कृषी-प्रधान-संस्कृतीचा बैलपोळ्याचा सण
शेतकरी बांधवांसाठी, त्यांच्या जीवनातील हा जिव्हाळ्याचा क्षण

या दिवशी भल्या पहाटे बैलांच्या गळ्या-नाकातील, दोर काढतात
मानेला जुंपलेला जू काढून,बैलांना मायेने-ओंजारतात गोंजारतात

हा दिवस शेतकऱ्यांसाठी, बैलांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा
वर्षभर त्यांच्या खांद्यास खांदा लावून राबणार्‍या बैलांस पूजण्याचा

शेतीस ट्रॅक्टर असूनही बैलांचा वापर,शेतीच्या अवजड कामांसाठी
माणसां-पिकाची वाहतूक,नांगरणी,पेरणी,मळणीस, बैलांची जोडी

शेतीप्रधान-देशात बैलपोळा, गोठ्यातील बैलांना न्हाऊ-माखू घाला
शिंगे कोरुन, रंगी बेरंगी रंगवून, रेशमी-बाशिंगे-गोंडे, सजवा त्याला

पाठीवरती मखमली झुल, ऐटदार रुबाबदार बैलांची, जोडी चालते
वाजंत्री वाजवून, मिरवत-गाजत,थाटात-जोशात, मिरवणुक निघते

लेझीम पथक-पुढे-मागे नृत्य, डूल डुलती, तालात घंटाही निनादती
गावच्या वेशीवर पोहोचून, बाया-बापड्या बैलांची पूजाअर्चा करती

पुरणपोळीचा थाटमाट,डोळ्यांमध्ये कौतुकाची लाट ओसंडून वहात
वर्षानुवर्ष त्यांची साथ,उत्सव-मूर्ती-ढवळ्या-पवळ्यांची खास तैनात

रात्रंदिन घाम गाळी,मेहनत करी, अथक कष्टांनी बहरते अवघी भुई
कृतज्ञ भावनेतून बैलपोळ्याच्या सणाने, सांगा कसे व्हावे हो उतराई

फलीत कष्टांचे,अंकुरे भूमातेची कुस, वा-यावर डोले पिकांची पैदास
थंडी-वार्या-पावसात घेता तुम्ही त्रास,मुलाबाळांच्या मुखी पडतो घास

युगानुयुगांची समृद्ध संस्कृती, जतन करणारा हा बैलपोळ्याचा सण
शेतकरी-जीवनाशी जवळचं नातं, आम्ही तुमचं कसं फेडावं हे ऋण

गळा घुंगरमाळा, नाद खुळा बैलपोळा, डोळ्यांमध्ये कौतुक झळकते
"प्राणिमात्रांत देवाचा-वास,त्यांची पूजा ही देवाची पूजा"-जाणीव होते

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!