कविता – 🌷 ” जाणीव “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २७ ऑक्टोबर २०१६
अगदी जन्मल्यापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत …
कशा-ना-कशा मागं माणूस सतत असतो धावत …
म्हणतात ना, “सरड्याची धाव, फक्त कुंपणापर्यंत” …
घबाड जरी मिळालं तरी, हावं नाही संपता संपत …!
जणू जन्मतःच बाळकडू, सगळं गोळा करत जाणं …
पोटातून बाहेर पडून, जगाचा विविध अनुभव घेणं …
अंतर्गत मायाजालाचं ब्रह्मान्ड, बाह्य-जगताचं ऋण …
तेथूनच सुरुवात होते, होणारे संस्कार गोळा करणं …
घट्ट-बंद-मूठ एकदा उघडली की, ती उघडीच राहते …
आयुष्यभर, पोतडीत जमा करणं ही चालूच राहते …
वय वाढत जातं, माया मोह-जाळ्यात पार गुरफटते …
ही”माया” मात्र आईच्या मायेहून फार वेगळी असते …!
यथावकाश विद्यार्थी-दशेबरोबर सुरु होतं ज्ञानार्जन …
मग पोटासाठी-नोकरी-धंद्यासाठी वण-वण करणं …
नंतर परिस्थिती-निर्मित अपमान-टक्के-टोणपे खाणं
सरते शेवटी आपापल्या कुवतीनुरुप धनार्जन करणं …
हे पै-पैसा कमावण्याचं दुष्ट-चक्र एकदा का सुरु झालं, …
की नाही दुसरी-कसली भ्रांत, ना कशाचा कशाला मेळ …
काळ्या पाण्याची सजा-जणू माणस होतो”कोलूचा बैल”…
दुसरं काहीही करण्यासाठी नसते इच्छा अन् नसतो वेळ …
अगतिकपणे रेटतो धनार्जनाचा जीवघेणा एकतर्फी खेळ …
कष्टानं कितीही”जमवली पूंजी”तरी ना मिळंत समाधान…
दिवस येतो-व-आला-तसा-जातो, संपत जातं जीवनमान…
अनंत कोटी गरजा आणि हाव यांतच अडकतात पंचप्राण…
साठी-सत्तरीत येई अंमळ शहाणपण पण उरत नसतं त्राण…!
हमखास विसरतो, आपण सगळे रिक्त हस्ते आलो आहोत…
जाताना सुध्दा, फक्त रिकाम्या हातानेच जाणार आहोत…
“हे माझं-ते माझं” म्हणून मिळेल ते सारं काही कवटाळतो…
त्यात काहीच”राम”नाही”हे अंतर्यामी पक्के जाणून असतो !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply