कविता -🌷 " जगायचं भान हरपून "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
सकाळी-सकाळी बहरलेला पारिजात अंगणातला
फुलांचा सुगंधी-केशरी सडा टाकून, होतो मोकळा
सर्वस्व अर्पण करुन "रिते"होण्यातील समृद्धपणा,
किती सहजपणाने दाखवतो जन्मजात उदारपणा
'प्राजक्त सडा टाकतो अन् मोकळा-ढाकळा होतो
त्याचा सुंदर-मंद-सुगंध पसरवून मन प्रसन्न करतो
इवल्याश्या नाजुकशा फुलांचा हलकासा तो भार
वाटतो सकाळच्या वातावरणात हवाहवासा फार
प्रत्येक फुला-फुलामधील सुवासाचा दरवळ सुप्त
प्रत्येक देठा-देठातील केशराने, डोळे होतात तृप्त...
मातीकडून घेतलेल्या जीवन-रसाचं अद्भुतसं देणं,
सुगंधाच्या गोड स्वरूपात ते निसर्गाला परत करणं
कळी-न्-कळी खुलवून, फुलांचं ते फुलणं - बहरणं...
दर दिवशी भरभरून, उपकारांची परत-फेड करणं...
प्राजक्ता पासून शिकण्यासारखं, बरंच काहीसं आहे
जीवन कितीही क्षणिक असलं तरी ते अनमोल आहे
बहरण्यातील परिपूर्णता-"देण्यातील समाधान"-चाखून
वर्तमानात जगायचा-प्रत्येक क्षण-न्-क्षण, भान-हरपून
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply