कविता – 🌷 ‘ जगणं ‘

कविता - 🌷 ' जगणं '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शुक्रवार, १९ एप्रिल २०२४
वेळ - संध्याकाळी, ५ वाजून ४४ मि.

माणसं लहानपणी कशी निरागस असतात
मोठी झाल्यावर, भावना का बोथट होतात

वयाबरोबर कोमल भाव का जरबट होतात
कदाचित यालाच "जीवन-जगणं"म्हणतात

असा एकही दिवस जात नाही जेव्हा स्मृती,
सजीव होऊन जणू पुन्हा फेर धरुन नाचती

काळाच्या ओघात जाती, माया-ममता-नाती
प्रेमस्वरुप आई-बाबा, माझी प्रति-आई-ताई

हात उंचावून-कैक, हसत निरोप घेऊनी गेले
कळत नकळत, जीवाला चटका लावूनी गेले

पाठी वळून पाहता, आज प्रकर्षानं जाणवतंय
की काळासह आपलं काय काय वाहून गेलंय

भले त्यास"अनुभव"हे गोंडस नाव दिलं जातं
पण ज्याचं"जातं"त्याला खरं ते चांगलं कळतं

🌷@तिलोत्तमा विजय लेले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!