कविता -🌷 ” चैतन्याचा प्रकाश “


कविता : 🌷 " चैतन्याचा प्रकाश "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |

दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार
दिव्याला देखून नमस्कार, दिव्याला नमस्कार

रोजच्या दिवे-लागणीच्या वेळी घरो-घरी ही
लहान मुलांची, हमखास प्रार्थना असायची

आज दीप-अमावस्या किंवा दर्श-अमावस्या
संस्कृतीत मानाचं-स्थान आहे या दिवसाला

श्रावण महिना सुरु होण्याचीच चाहूल देणारा
हा दिवस आषाढाच्या सांगतेची ग्वाही देणारा

सुवासिनी घरातील सर्व दिवे स्वच्छ करतात
कणकेचे दिवे लावून त्यांची आरती करतात

दीप पूजनाने-दीप अमावस्या साजरी करतात
तर्पण करुन पितरांना पुरणाचा नैवैद्यही देतात

कणकेचा एक दीप घरी, दक्षिण दिशेस ठेवतात
पितरांच्या स्मरणा-प्रीत्यर्थ, दान-धर्मही करतात

दीप-प्रज्वलन-पूजन-व्रत-पालन-दान अशी प्रथा
सर्व प्रकारच्या दोषांपासून व पापांपासून मुक्तता

पिंपळ, केळी, लिंबू, तुळशी आदी रोपे लावतात
लहानांना ओवाळतात, दिव्यांची आरास करतात

प्रत्येक लहान-मोठ्या सणवारी मांगल्याची पूजा
सर्व जनांचे कुशल-मंगल व्हावे हीच प्रमुख इच्छा

रवी-चंद्राच्या आगमने जशा उजळती दाही दिशा,
सुख-समाधान-शांती नांदावी, हीच मनी सदिच्छा

घरातील इडा-पिडा टळून, अज्ञानाचा नाश व्हावा
मांगल्याचा-समृद्धीचा-चैतन्याचा प्रकाश पसरावा

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!