कविता -🌷” आराधना “

कविता -🌷" आराधना "
कवयित्री- तिलोत्तमा विजय लेले

शिव-पार्वती विवाह-सोहळा संपन्न होता,
गौरीच्या भाळी उमटली अर्धचंद्राकृती घंटा
त्यामुळे नंतर देवीचे नाव पडले, “चंद्रघंटा”
तिसऱ्या दिनाची शुभ-माळ चंद्रघंटे-करीता

शस्त्रं-अस्रांनी सज्ज दश-भुजा-त्रिनेत्रादेवी
त्रिशूल-गदा-धनु-खड्ग-एकेक-करी-ठेवी
कमल-पुष्प-कमंडलू देवीच्या एकेका-हाती
उजव्या हातात तलवार, एक हस्त वर-दायी

युध्दामध्ये चंद्रघंटा देवीचे वाहन होते व्याघ्र
रणचंडिकेचे अति-भीषण-स्वरूप घेतले उग्र
खच पडला दानवांचा, रणी देवी सदैव अग्र
धुम्रलोचनाचा-वध होता पराभूत दैत्य समग्र

व्याघ्रारूढ देवीच्या डोळ्यातून संतप्त अंगार
कौशिकी-रुपामध्ये चंद्रघंटा दुर्गेचा-अवतार
क्षणार्धात केला तिने शुंभ-निशुंभाचा संहार
अद्भुत पराक्रमाने तिन्ही लोकी जयजयकार

भक्तांनी चंद्रघंटा देवीचे, करता पूजनअर्चन
त्यांच्या सर्वबाधा नष्ट, कार्ये होती निर्विघ्न
देवीच्या शुभ-आशिर्वादे, होई पाप-क्षालन
कष्ट निवारण करून, सकल भक्तांचे रक्षण

🌷@तिलोत्तमाविजयलेले
🙏🕉🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!