कविता :🌷’ गुरुदक्षिणा ‘

कविता :🌷’ गुरुदक्षिणा ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, ३ जुलै २०२३

||श्री कृष्णम् वन्दे जगत्गुरुम् ||
जन्मापासूनच शिक्षण होतं सुरु
ते अनंत काळा-पर्यंत रहातं सुरु  
शिकवण देतो तो होतो सद्गुरु !

आयुष्यात अगणित होतात सद्गुरु
व्यक्ती-प्राणी-स्थिती-आत्मा-वास्तु
शिष्यांसाठी सद्गुरु जणू ‘कल्पतरु’ 
कृतज्ञतेने देती आशिर्वाद ‘तथास्तु’ !

कधी अंतस्थ-हेतूने, कधी नाईलाजाने 
योग्यता जाणूनही शिष्यास नाकारती
नाउमेद न होता-अंतस्थ-गुरुच्या साक्षीने 
एकलव्या-सम श्रेष्ठ-धनुर्धर या जगती !

परशुरामांसम-गुरु प्राप्त करण्यासाठी
शूर-वीर कर्णाने लपविल्या कैक गोष्टी
ज्ञानार्जन-युद्ध-कौशल्य-कूट-रणनीती
गुरुसेवा करुनही शाप मिळाला शेवटी !

सांदिपनी ऋषींच्या गुरुकुल आश्रमात 
श्रीकृष्ण-बलराम दोघेही झाले निष्णात 
गुरु-सेवेतून त्यांनी ज्ञान केले आत्मसात 
शंखासुर-वध करुन वाचविले गुरु-पुत्रास

गंगातीरी आदि शंकराचार्य चालत होते
गंगेच्या दुसऱ्या तीरी काही शिष्य होते 
गुरुआज्ञेने शिष्य गंगाजल चालून आला
गंगातटी उमलत्या-कमळांचा पूल झाला !

‘गुरुआज्ञा-प्रमाण’या विश्वासाचा पूल होता
जणू पोहता-न-येणार्या-शिष्यांच्या-परीक्षेचा,
एकच उत्तीर्ण होऊन-पट्टशिष्यपदी पोहचला !
‘पद्मपादाचार्य’-म्हणून तो नावारूपास आला !

प्रत्येक गुरु शिक्षण-देतो अंती परिक्षा ही घेतो 
गुरु-परीक्षेत जो खरा उतरतो तो यशस्वी होतो
जसा कुमार नरेंद्र हा स्वामी विवेकानंद बनतो !
समर्थ-शिष्य-कल्याण, कल्याण-स्वामी होतो !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!