कविता – 🌷 ” गरुडाची झुंज ”
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – ११ डिसेंबर २०१६
गरुड, श्रीविष्णूंचं लाडकं वाहन …
मोठं डोकं, पक्षी असून बुद्धिमान
दूरची दृष्टी-तीक्ष्ण नजरेचं वरदान …
आकाराने, वजनाने मोठा-गरुड हाच पक्षांचा राजा
संपूर्ण आकाशात त्याच्या करारनाम्यांचा गाजावाजा
अंगात शक्ति, ताकदीचा जोर, वरचढ म्हणून, होतो शिरजोर
सर्वत्र त्याचा भयंकर दरारा लहान-थोर-पक्ष्या-प्राण्यांवर
साप, कासव, माकडं पकडून, भर्रकन घेतो भरारी उंचा-वर …
त्याच्या अंगात दांडगी-शक्ति – मोठया पंखामध्ये प्रचंड गती …
उंचीचं त्यास खास आकर्षण-अन्य पक्षांहून मोठी आकारमिती
मोठे टपोरे डोळे, अत्यंत तीक्ष्ण नजर, उंचावरूनच हेरतो ” गाफील ” सावज,
संपवतो त्याचं आव्हान, अचानक घालून जीवघेणी झडप …
घिरट्या मारतो पंज्यांत भक्ष्याला उचलून,
अणकुचीदार चोचीनं, मग समाचार घेऊन …
फडशाच पाडतो त्याचा, खूप उंचावर नेऊन …
उंचच उंच डोंगरी …कड्या अन् कपारी,
शोधून, बांधतो घरटी–उंच उंच झाडांवरी
भन्नाट वाऱ्यावर होऊन स्वार, सुसाट वेगात उडे नभी
बघता-बघता त्याच्या वयाची, भरारीत उडून जाते चाळीशी …
म्हातार-पणाचे लागतात मग वेध–सगळ्या गोष्टीत करु लागे धडपड
” भक्ष्य “मिळवणं होऊन जातं जड, भराऱ्या मारणंसुध्दा होतं अवघड …
कमी- कमी होतं जातं, पंखातील बळ-पाय व पंज्यांची पक्कड होते सैल
उंच उडणं तर उरतो भूतकाळातील एक खेळ
जातं निसटून, कसेबसे सापडलेलं सावज …
अणकुचीदार चोचीचं टोक पण होतं बोथट …
एकेकाळच्या आभाळाच्या राजाचा, दरारा लागतो हळू-हळू ढासळायला
जीवन जगणंच होऊन बसतं कठीण, म्हातारं-पण लागतं नकोसं वाटायला …
शेवटी निर्णय होतो त्याचा पक्का, पिल्लावळ बघे टकामंका …
त्यासर्वांचा घेतो साश्रु-निरोप, अन् जमेल तसे उडत- उडत
जागा करून,कड्या-कपारीत…गाठतो, उंचीच्या डोंगराचं टोक
जुनी चोच आपटून-आपटून, तोडून-मोडून, चक्काचूर करून
मनाचा हिय्या करून, देतो एकदाची फेकून
स्वतः,रक्त-बंबाळ होऊन, वेदना अपार सहन करुन
देतो भूतकाळ लांब फेकून-हे मोडणं, तोडणं, फेकणं
सर्व क्रिया पूर्ण करताना, खाणं-पिणं, मौज-मजा करणं,
सारं-काही एकदमच पूर्णपणे बंद …
चोचीनंतर नंबर असतो जुन्या, शिणलेल्या, कमजोर-पंखांचा …
नाकी दम येतो, त्यांनाही ओरबाडून, उपटून, काढता- काढता …
अखेरीस गरुडाची सत्व-परिक्षा एकदा संपते …
जुनं समूळ गेल्यावर, नव-पर्वाची सुरवात होते …
नवीन कोरी, अणकुचीदार चोच, पुन: येऊ लागते …
नवे दमदार, भरारी घेणारे पंख फुटण्यास सुरवात होते …
हांहां म्हणता, गरुडाचं नवं-विश्व जुन्या-मधून-पुन्हा उभं होतं
सरते शेवटी गरूड, शून्यातून नवं विश्वं उभारतो !
उंच उंच भरारी घेत, स्वतः पुनर्निर्मिती करु शकतो,
त्याच्या नेहमीच्या डौलात अन् दिमाखात वावरतो,
अजून तीस वर्षे गगनी अधिराज्य गाजवू शकतो …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply