कविता :🌷 ‘ खर्या-भक्तीचा भुकेला ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : मंगळवार, ४ एप्रिल २०२३
वेळ : दूपारी, ४ वाजून ५२ मि.
जो निर्गुण, निराकार, अनादी, अनंत
असा तो परम शक्ती-शाली भगवंत !
सर्वत्र जो असतो भरुन पूर्ण आसमंत
त्या शोधण्याचा ध्यास, कठीण अत्यंत !
बाळाच्या भाबड्या हास्यातून तो दिसतो
पिलांच्या गोड किलबिलाटातून ऐकू येतो
मातीतल्या इवल्याशा अंकुरातून प्रकटतो !
नवजातासाठी मातेमध्ये दुग्धांमृत निर्मितो !
रवी-किरणांनी मिट्ट काळोखी-रात्र संपवतो
पर्जन्यवृष्टी करून धरेला शांत-तृप्त करतो !
जीवितांसाठी पिकांमधे अन्नरुपी-दाणे भरतो
शीतल चंद्र-प्रकाश बनून तप्त-दाह घालवतो
फुला-फुलामध्ये नयन-रम्य रंग-सुगंध भरतो
पाना-पानागणिक मधुर, रसाळ फळं निर्मितो
माणसांची-पशु-पक्षांची भूक-तृषा भागवतो !
रणरणत्या उन्हात वृक्षांची छाया बनून रक्षितो
प्रत्येक जीवित जीवात, तो अंश-रुपात असतो !
मग तो जीव कितीही लहान अथवा मोठा असो
मुंगी, अमिबा वा अवाढव्य हत्तीतही तोच असतो
नदी-ओढा-झरा, अथांग सागरातही तोच असतो
कशात आहे, पेक्षा कशात नाही हे शोधणं जरुरी
कारण ज्याच्यात तो नाही असा एकही जीव नाही
तंटा-वाद-लढाया-युद्धं येथे तो नक्कीच असत नाही
अन्याय-शोषण-दहशत जेथे, तो असणं शक्य नाही !
तो खर्या-भक्तीचा भुकेला, ऐश्वर्यादी-स्तोमांचा नव्हे
भक्त धृव-प्रल्हाद यांच्या हाकेला भगवंत धावून गेले !
दोन हस्त अन् मस्तक जेथे विनम्र-भावाने जोडलेले,
ईश्वर “न मागून-न बोलावूनही हजर,” पक्के ठरलेले !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply