कविता : 🌷’ खरं सुख ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : मंगळवार, १८ एप्रिल २०२३
वेळ : ११ वाजून ५० मि.
” अगदी प्रत्येक घासागणिक तोंड उघडते आहे “
हे सुप्रसिद्ध बोल आहेत, आमच्या कै. काकांचे !
आईच्या हातची पुरणपोळी खातानाची मज्जा मस्त
आम्ही सगळे नकळत, जरा जास्त करत असू फस्त !
कटाची आमटी-दूध आणि लोणकढी-साजुक तूप,
सणावारी पुरणपोळीवर आम्ही ताव मारायचो खूप !
भल्या पहाटे उठून, स्वयंपाकाची जय्यत तयारी करुन
साध्या पाट्या-वरवंट्यावरच सगळं पुरण वाटून-घोटून,
पूर्ण कुटुंबासाठी पुरणा-वरणाचा किचकट घाट घालून,
त्या माऊलीच्या चेहर्यावर मात्र आनंदच वाही ओसंडून!
फक्त एका चहाच्या कपावर इतकं राब-राब राबूनही,
सर्वांना आग्रहानं वाढल्याविना, घासही खाल्ला नाही !
सर्वजणं जेवून-विडा खाऊन ढेकर दिल्यावर तृप्तीची,
झाक-पाक-आवरा-आवर करुन मग कुठे ती जेवायची !
बहुधा अवखळ-अजाण वयामुळे कधी नाही ते जाणवलं,
स्वतः ‘आई-आजी’ झाल्यावर, त्यातलं खरं सुख उमगलं !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply