कविता -🌷 ” क्षण मोलाचे-आनंदाचे “

कविता -🌷 ” क्षण मोलाचे-आनंदाचे “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २७ नोव्हेंबर २०१६

आपल्या नकळत हळूच, चोर-पावलांनी
रेतीच्या बारीक-बारीक सुवर्ण कणां-समान
आयुष्याचे क्षण-न्-क्षण जाती ओघळूनी
पाणीदार मोत्यांची लड जर तुटूनच गेली,
टप्पोरे मोतीच-मोती जातील घरंगळून …
एकवेळ पाऱ्याला ठेवता येईल पकडून …

पण पार निसटूनच गेलेल्या समयाला
झंझावाती वेगात हलके स्पर्शून गेलेल्या,
प्रचंड ओढ अशा, वाहत्या पाण्याला
कसं काय बरं ठेवणार मुठीत धरून …

क्षण सारे मोलाचे-आनंदाचे …
भुरुभुरु,उडणाऱ्या कारंज्यांचे 
करती, उधळण सप्त रंगांचे
अगणित-अगम्य रंग-छटांचे …

इंद्रधनुचे, जणू सुख पाझरणारे …
मनाला सतत भुरळ घालणारे 
अवघं देह-भान विसरवून टाकणारे 
अगम्य-अनामिक ओढ लावणारे …

क्षण मोरपंखी …नाचत येती थुई-थुई …
प्रीतीचे-अनमोल क्षण सोनेरी-रूपेरी …
मनाच्या डोही झळकती सोन-सकाळी
गंधित क्षण आस्मानी-आरस्पानी 

मधुर क्षण चंदेरीगोड थट्टा-मस्करी
सुखद हास्य-कल्लोळ  ऐन-दुपारी …
मदहोश-क्षण ते लुकलुकती रात्रभरी …
नाजूक-क्षण मोहमयी भान हरपे सदाही …
क्षण निरागस …बाळाच्या हास्यासम् खिदळणारे
क्षण अवखळ …वासरासम बागडणारे
क्षण स्तब्धप्रेमी-जीवांना जोडणारे …
क्षण अनामिकसदा हुरहूर लावणारे …

क्षण बहुमोल …भक्ति-रसात चिंब भिजलेले …
डोळ्यांच्या डोहांमधुन …नकळतच झिरपणारे …
क्षण अनमोल …ब्रह्मानंदी तल्लीन करणारे …
आप-पर-भाव मिटून, स्थूलातून सूक्ष्माकडे झेपावणारे ..
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!